गणपतीत दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार असे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:06 IST2025-08-11T11:05:46+5:302025-08-11T11:06:29+5:30

अनेक मंडळे मंडप उभारणीसाठी वीजजोडणी किंवा मंडपबांधणीच्या कामात रस्ते खोदून ठेवतात

BMC impose a fine of Rs 2000 per pothole on councils violating the rules this year | गणपतीत दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार असे का?

गणपतीत दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार असे का?

सुजित महामुलकर 

विशेष प्रतिनिधी

गणेशोत्सव म्हणजे भक्ती, जल्लोष आणि एकत्र येण्याचा सुंदर संगम. गणेशोत्सव जवळ आला की शहरावर रंगीबेरंगी छटा सजते, ढोल-ताशांच्या गजराने शहर दुमदुमते आणि गणपती बाप्पाच्या स्वागताचा उत्साह झळकतो. मात्र या आनंदसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी रस्ते व फुटपाथ खोदून मंडप उभारण्याचा विषय चर्चेत येतो. अनेक मंडळे मंडप उभारणीसाठी वीजजोडणी किंवा मंडपबांधणीच्या कामात रस्ते खोदून ठेवतात. त्यामुळे वाहनांचे अपघात ही वाढतात.

मुंबई महापालिका यंदा नियम मोडणाऱ्या मंडळांवर प्रतिखड्डा दोन हजार रुपये दंड आकारणार आहे. रस्त्यावर मंडप उभारताना खड्डा खोदल्यास प्रतिखड्डा १५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय गणेशभक्तांच्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या आक्षेपानंतर, राज्य शासनाच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आला. आता पूर्वीप्रमाणे २,००० रुपये दंड कायम केला आहे. पण, फक्त दंड आकारून हा प्रश्न कायमचा सुटणारा नाही. अनेक मंडळांना जागेची अडचण असते. तर काही मंडळे दंड भरतच नाहीत. आपल्या आनंदामुळे शहरांची वाट लागत असेल तर त्याची जबाबदारी गणेश मंडळांनी का घेऊ नये? राजकारण्यांनी देखील मतांसाठी कशी आणि किती सूट द्यायची हे ठरवले पाहिजे.

यासाठी, प्रत्येक प्रभागात महापालिकेने मंडळांसाठी विशिष्ट मैदाने किंवा मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून रस्त्यांवरील मंडपांची संख्या कमी होईल. हल्ली अनेक गणेश मंडळे रस्ता खोदण्याऐवजी दोन पहारी जमिनीत खोदून त्याला बांबू किंवा मंडपाचा खांब बांधतात. काही ठिकाणी मोठा चौकोनी पाया असलेल्या लोखंडी रॉडवर मंडप उभा केला जातो. यामुळे जमिनीत खड्डा खोदण्याची आवश्यकता भासत नाही. ही पद्धत राजकीय सभा-समारंभासाठीच्या मंडपाला वापरात येते, अर्थात त्यासाठी थोडा अधिक खर्च होऊ शकतो; पण सार्वजनिक रस्त्याची होणारी संभाव्य हानी टाळता येऊ शकते.

मुंबईच्या गणेशोत्सवासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक, भक्त येतात. बहुतांश गणेश मंडळे केवळ हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत असली तरी ती वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. परंपरेचा मान राखत, शिस्तीचा सन्मान करणे ही आज काळाची गरज आहे. जर उत्सव आणि शहरी सुविधा यांचा योग्य समतोल साधला, तर गणेशोत्सव केवळ भव्यतेनेच नाही तर व्यवस्थापनाच्या आदर्श उदाहरणानेही लक्षात राहील. एवढे चांगले करत असताना रस्त्यावर खड्डे केले म्हणून आपल्या मंडळाच्या वाट्याला वाईटपणा येत असेल तर गणेश मंडळांनी त्याचा विचार करण्याची गरज आहे.

महापालिकेनेदेखील यासाठी मंडळांना जबाबदार धरताना आपली जबाबदारी झटकू नये. मंडळाकडून दंड आकारताना रस्त्यावर आधीपासूनच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवले गेले आहेत का? याची खातरजमा करावी. नाहीतर 'दिव्याखाली अंधार, मंडळे जबाबदार' असे होता काम नये. यंदापासून गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा होणार आहे, याचे भान गणेश मंडळे आणि यंत्रणांनी राखले तर उत्सवाशी जोडला गेलेला मुंबई शहराचा नावलौकिक वाढण्यास मदतच होईल.

Web Title: BMC impose a fine of Rs 2000 per pothole on councils violating the rules this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.