सुजित महामुलकर
मुंबई महापालिका निवडणुकीची मुं रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. प्रचाराला वेग आला आहे. उद्या, मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबेल आणि गुरुवारी, दि. १५ जानेवारीला मुंबईकर आपला कौल देतील. या निवडणुकीत मुख्य लढत महायुती आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीमध्ये रंगताना दिसत असली, तरी काही प्रभागांत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका निकालावर प्रभाव टाकू शकते, असे चित्र आहे. राज्यात अनेक शहरांत भाजप आणि शिंदेसेना आमने-सामने असले तरी राजधानी मुंबईत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे.
भाजप आणि शिंदेसेना महायुती म्हणून एकत्रितपणे लढत आहे. भाजपने संघटनात्मक बळ, आर्थिक संसाधने आणि आक्रमक प्रचार यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सभांपेक्षा प्रभागनिहाय रोड शो, स्थानिक बैठका आणि लक्ष्यकेंद्रित प्रचारावर महायुतीचा भर आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, जुन्या चाळींचा पुनर्विकास आणि 'डबल इंजिन सरकार'चा नारा महायुती देत आहे.
उद्धव आणि राज ठाकरे प्रथमच एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल. या युतीमुळे मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आला असला, तरी जागावाटपावरून मनसेतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. काही नेत्यांनी पक्ष सोडून महायुतीची वाट धरली असली, तरी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने मराठी माणूस भावनिकदृष्ट्या जोडला गेल्याचे चित्र आहे.
काँग्रेस मात्र संभ्रमावस्थेत आहे. हा पक्ष स्वतंत्रपणे लढत असला तरी त्याच्याकडे ठोस नेतृत्वाचा अभाव, विस्कळीत प्रचार आणि मर्यादित संसाधने आहेत. काँ आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची लढत प्रामुख्याने अल्पसंख्याकबहुल आणि झोपडपट्टी भागांपुरती मर्यादित राहण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी निवडक प्रभागांत दलित-बहुजन मतांवर प्रभाव टाकू शकते. मात्र, सत्तासमीकरणात निर्णायक भूमिका बजावेल, असे सध्या तरी दिसत नाही
'मराठी भाषा, मराठी माणूस'
राज ठाकरे यांनी २० वर्षांनंतर उद्धवसेनेच्या मुंबईतील काही शाखांना भेटी दिल्याने दोन्ही बाजूंच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मराठी भाषा, मराठी माणूस, मुंबईचे अस्तित्व आणि मुंबईचा कारभार मुंबईकरांकडे' हे त्यांचे प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. काही प्रभागांत, विशेषतः शहर भागात, ठाकरे बंधूंचे मत एकत्रीकरण महायुतीसाठी आव्हान ठरू शकते, असे मानले जाते.
मराठी मतदार आमच्यासोबत!
शिंदेसेनेने 'मराठी मतदार आमच्यासोबत' असा दावा करत ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे. भाजपने उपनगरांतील हिंदी भाषिक, तसेच दक्षिण भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याबाहेरून नेते प्रचारात उतरवले.
Web Summary : Mumbai's election sees a MahaYuti vs. Thackeray brothers fight. Congress, VBA impact is limited. Marathi identity is key. BJP targets diverse voters. It is a crucial test for all.
Web Summary : मुंबई चुनाव में महायुति बनाम ठाकरे बंधु मुकाबला है। कांग्रेस, वीबीए का प्रभाव सीमित है। मराठी अस्मिता अहम है। भाजपा विविध मतदाताओं को लक्षित करती है। यह सभी के लिए महत्वपूर्ण परीक्षा है।