Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘राजकारणात जय पराजय होत असतात. पराभव होईल म्हणून.…’, राज ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:36 IST

BMC Elections Result: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. जिंकणे नव्हे तर लढणे महत्त्वाचे, असे बाळा नांदगावकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काल लागलेल्या मुंबई महानरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. ठाकरे बंधूंची युती झालेली असल्याने या निवडणुकीत मनसेला चांगल्या जागा मिळतील, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र मनसेला केवळ ६ जागांवर यश मिळालं. तर उद्धवसेनेला मात्र ६५ जागा मिळाल्या. त्यामुळे निकालांनंतर मनसेच्या अपयशाची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. जिंकणे नव्हे तर लढणे महत्त्वाचे, असे बाळा नांदगावकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टमध्ये बाळा नांदगावकर यांनी लिहिले की, जिंकणे नव्हे तर लढणे महत्त्वाचे. राजकारणात जय पराजय होत असतात. पराजय होईल म्हणून शस्त्र टाकणे आणि शत्रूशी लढा न देता शरण जाणे हा खरा पराभव असतो. समोरील सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड पैशाची, सत्तेची ताकद, सोबत शासकीय यंत्रणा तरी हा चक्रव्यूह भेदून मनसे आणि उद्धवसेनेचे समस्त ठाकरे सैनिक यांनी यथाशक्ती जोरदार लढा दिला, अशा शब्दात नांदगावकर यांनी समाधान व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, ज्यांना उमेदवारी मिळाली पण विजय नाही मिळाला त्यांनी खचून जायचे कारण नाही कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तसेच काही कारणास्तव ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी देखील संयम ठेवावा कारण पुढे त्यांना ही अनेक संधी चालून येतील. दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे अजून बराच मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे आणि तो आपण गाठणारच, असा विश्वास नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

आपली लढायची उर्मी ही सत्ताधाऱ्यांना आणि मस्तवाल यंत्रणेला घाम फोडणारी होती. निवडणुकीत जरी अपेक्षित यश आले नाही तरी खचून जाणारे ठाकरेंचे सैनिक नाहीत. आपण सर्व जण आपल्या मराठी माणसांसाठी त्यांच्या समस्येसाठी आपली मराठी अस्मिता जपण्यासाठी परत एकदा जोमाने कामाला लागू, अशा शब्दात लढा सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्क करत सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्र धर्मासाठी आपला लढा आहे व तो चालूच राहील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Victory and defeat are part of politics: Raj Thackeray loyalist's post.

Web Summary : Following MNS's underwhelming performance in Mumbai elections, Bala Nandgaonkar emphasized the importance of fighting, not just winning. He urged party workers to persevere, viewing setbacks as stepping stones and focusing on Marathi identity and Maharashtra's well-being, not just power.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मनसेशिवसेनाबाळा नांदगावकर