अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:38 IST2025-12-29T18:35:24+5:302025-12-29T18:38:26+5:30
Kishori Pednekar: मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव सेनेने जाहीर केलेल्या पहिल्या ७५ उमेदवारांच्या यादीत माजी महापौर किशोरी पेडणेकरांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव सेनेने जाहीर केलेल्या पहिल्या ७५ उमेदवारांच्या यादीत माजी महापौर किशोरी पेडणेकरांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असतानाही किशोरी पेडणेकर यांना अजूनही 'एबी फॉर्म' देण्यात आला नाही. त्यानंतर आज त्यांनी तातडीने मातोश्रीवर उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, अशीही माहिती आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर मुंबईत १३० हून जास्त जागा मिळतील, असा विश्वास किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला. त्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी स्वतःची उमेदवारीही जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आता युतीच्या जागावाटपात किशोरी पेडणेकर यांचा वॉर्ड क्रमांक १९९ (दक्षिण मुंबई) मनसेच्या वाट्याला जाणार की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स कायम
२०१७ च्या निवडणुकीत किशोरी पेडणेकर वॉर्ड १९९ मधून निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुकही झाले. मात्र, यंदा या वॉर्डमध्ये एखादा तरुण चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर पक्षाने नवीन उमेदवाराला संधी दिली, तर किशोरी पेडणेकरांचे काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना पक्षाकडून शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळतो की, त्यांना डावलले जाते? हे लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे, किशोरी पेडणेकर यांना तिकीट न मिळल्यास दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.