"मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं..."; रवींद्र चव्हाणांचा ठाकरेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:29 IST2026-01-13T17:16:28+5:302026-01-13T17:29:40+5:30
BMC Elections 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 'ठाकरे बंधूं'वर निशाणा साधला.

"मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं..."; रवींद्र चव्हाणांचा ठाकरेंवर हल्लाबोल
BMC Elections 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली. महायुतीनेही जोरदार प्रचारसभा घेतल्या. आज प्रचाराची सांगता आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मराठी मुद्द्यावरुन ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. "बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उबाठा गटातील नेते जाणीवपूर्वक एक गोष्ट विसरतात की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर गोळीबार करणारे त्यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री काँग्रेसचे होते आणि केंद्रातही काँग्रेसचेच सरकार होते याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो आणि आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना ते उबाठा गट मराठीचा कैवार घेत आहेत,अशी टीका चव्हाण यांनी ठाकरे बंधूंवर केली.
"संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे रक्त सांडले, त्या आंदोलनावर गोळ्या झाडण्याचे पाप काँग्रेसचे आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य आहे. सत्तर वर्षांपूर्वी १६ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्या घटनेतून प्रेरित होऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उबाठा गटातील नेते जाणीवपूर्वक एक गोष्ट विसरतात की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर गोळीबार करणारे त्यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री काँग्रेसचे होते आणि केंद्रातही काँग्रेसचेच सरकार होते याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो आणि आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना ते उबाठा गट मराठीचा कैवार घेत आहेत, ते काँग्रेसची बंदूक स्वतःच्या खांद्यावर घेऊन अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. महापालिका निवडणूक प्रचार सांगता करताना ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसच्या कुबड्या घेऊन मुख्यमंत्रीपद पदरात पाडले
काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे सरकार स्थापन करण्याचे पाप केले आणि १०५ हुतात्म्यांचा अपमान केला. केवळ स्वतःचे दुकान चालू ठेवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करताना उद्धव ठाकरे यांना मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे असेही चव्हाण म्हणाले.
१९९० च्या दशकात कोकणात रेल्वे आली, पण तेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती. तर मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांच्या प्रयत्नातून कोकण रेल्वे सुरू झाली होती. तर आज २०१४ पासून कोकण रेल्वेवरील अनेक स्थानके आणि परिसराचा कायापालट होत आहे, ती सुसज्ज झाली आहेत ती भाजप सरकारच्या काळात. काँग्रेस सत्तेत असताना या कोकणासाठी त्यांनी काही केले नाही मात्र त्याच कोकणी माणसांच्या पाठिंब्यावर घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले ते मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊनच असा मुद्दा रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला.
"उबाठा सेना आणि मनसे हे इतरांपेक्षा जास्त मराठीचे कैवारी कसे काय झाले आहेत? याचे उत्तर शोधण्याचा कुणी प्रामाणिक प्रयत्न केला आहे का? असा सवाल करत चव्हाण म्हणाले की, इथे जन्मलेला अमराठी भाषिक “आपण अमराठी आहोत म्हणून भाजपात जाऊ” असा विचार करून भाजपात येत नाही. तर इतर पक्षांमध्ये नेतृत्व, विचारधारा आणि भवितव्य मर्यादित आहे, म्हणून तो भाजपात येतो, हे वास्तव आहे, असंही चव्हाण म्हणाले.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजपाने मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसासाठी ठोस काम केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला. अभिजात भाषेचा दर्जा माझ्या माय मराठीला मिळाला तो फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळेच हे मान्य करावेच लागेल.