Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना, नगरसेवकांना कोंडून ठेवलं तरी... , संजय राऊत यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:43 IST

BMC Mayor Election: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धवसेनेने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना आहे, असं सूचक विधान केलं आहे.

नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र पराभव झाला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवसेनेला ६५ जागा जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे आता संख्याबळाचं गणित जुळवून मुंबईत आपला महापौर बसवण्यासाठी उद्धवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकीकडे महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या काँग्रेसला सोबत घेतानाच शिंदेसेनेच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धवसेनेने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत भाजपाचामहापौर होऊ नये ही सर्वांची भावना आहे, असं सूचक विधान केलं आहे.

मुंबई महानगपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी होणारी संभाव्य फोडाफोड टाळण्यासाठी शिंदेसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्याबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिंदेसेनेकडून जे नगरसेवक निवडणूक आले आहेत, त्यांच्यामध्ये बरेचसे नवे चेहरे आहेत. तसेच ते मुळचे शिवसैनिक आहेत. तसेच जो शिवसैनिक असतो. त्याच्या मनामध्ये मुंबईबाबत एक वेगळी भावना आहे. त्यामुळे मुंबईत भाजपाचा महापौर होऊ देऊ नये, असा सर्वांच्या मनामध्ये विचार आहे, असे आमच्या लक्षात आलेलं आहे. तसेच तुम्ही कितीही कोंडून ठेवलं तरी संपर्काची, संदेशवळणाची इतकी साधनं असतात की, त्या माध्यमातून संदेश येतच असतात, असे सांगत संजय राऊत यांनी शिंदेंचे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा, ठाकरे बंधूंचा व्हावा, भाजपाचा होऊ नये, अशी भावना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. तसेच देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर मुंबईत बसू शकतो. काल मी राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांचीही फोनवरून चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या या घडामोडींकडे तटस्थपणे पाहत आहोत. मात्र पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Everyone wants a Shiv Sena mayor in Mumbai, claims Sanjay Raut.

Web Summary : Sanjay Raut claims everyone desires a Shiv Sena mayor in Mumbai, not BJP. Despite efforts to isolate corporators, contact persists. Discussions are ongoing to make it happen.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६महापौरशिवसेनाभाजपासंजय राऊत