महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 08:42 IST2026-01-11T08:42:21+5:302026-01-11T08:42:35+5:30
२१ ते ४० वयोगटांतील १६ उमेदवारांना संधी देत मनसेने तरुणांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न

महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
महेश पवार
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेने ५२ उमेदवार उतरवले आहेत. उमेदवारी देताना मनसेने तरुणांना प्राधान्य देत नव्या दमाचे नेतृत्व पुढे आणल्याचे चित्र आहे. प्रभाग १५२ मधील सुधांशु दुनबळे हे मनसेचे सर्वात तरुण उमेदवार आहेत. वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. २१ ते ४० वयोगटांतील १६ उमेदवारांना संधी देत मनसेने तरुणांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे, तर २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
मनसेने उमेदवार देताना अनुभव व वयाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. ४१ ते ५० वयोगटातील २१, तर ५० वर्षांवरील १५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीतही मनसेने दोन वकील, दोन एमएस्सी, एक एमकॉम पदवीधर, तर बारावी उत्तीर्ण ते पदवीधर २४ उमेदवार देत आघाडी घेतली आहे. मनसे उमेदवारांत सर्वांत तरुण उमेदवार सुधांशूची एकूण मालमत्ता १८ लाख ६३ हजार रुपये आहे.
१ ते १० लाख रुपयांपर्यंत संपत्ती असलेले सहा उमेदवार
प्रभाग १८ च्या २५ वर्षीय सदिच्छा मोरे या मनसेच्या दुसऱ्या सर्वांत तरुण उमेदवार ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती १४ लाख ७ हजार रुपये आहे. लखपती उमेदवारांची संख्या २३ असून, १ ते १० लाख रुपयांपर्यंत संपत्ती असलेले सहा उमेदवार आहेत. तरुण नेतृत्व व सुशिक्षित उमेदवार देत मनसेने या निवडणुकीत जोर लावला आहे.