"भाजपा विचारधारेच्या उगमस्थानीच मराठी"; भाजपाचा 'मराठी कार्ड'वरुन ठाकरे बंधूंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:34 IST2026-01-14T16:34:23+5:302026-01-14T16:34:54+5:30
BMC Elections 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली. महायुतीनेही जोरदार प्रचारसभा घेतल्या.

"भाजपा विचारधारेच्या उगमस्थानीच मराठी"; भाजपाचा 'मराठी कार्ड'वरुन ठाकरे बंधूंवर निशाणा
BMC Elections 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली. महायुतीनेही जोरदार प्रचारसभा घेतल्या. ठाकरे बंधूंनी मराठी मुद्दा घेत भाजपावर टीका केली. दरम्यान, आता मराठी मुद्द्यावरुन भाजपाने ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. "भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन प्रकारासारखे आहे. मराठी भाषेबाबतचा आमचा दृष्टिकोन "आम्ही आपले आपण" असा अनेकवचनी आणि व्यापक असून त्यात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यांचा समावेश आहे, असे प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिले.
"सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मराठी सकारात्मकता पसरवणारे आहे ज्यातून मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार अपेक्षित आहे, असंही चव्हाण म्हणाले. विरोधकांवर कडक शब्दांत टीका करताना रविंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेचे राजकारणच करू नका कारण हा विषामृत असा खेळ नाही. विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली असून ज्ञानेश्वर माऊलींच्या "विश्वात्मके देवे" या वैश्विक तत्त्वाशी त्यांची बांधिलकी नसल्याचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.
रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपा आणि मराठी माणूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा असून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी भाषिक थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित देश आणि समाज घडविण्याचे काम भाजपा वर्षानुवर्षे करत आहे.
"केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या उन्नतीसाठी भाजपा कटिबद्ध असून राज्याची प्रगती, राज्यातील नागरिकांचं जीवन अधिक सुसह्य व्हावं, देशभक्त आणि संस्कारित पिढी तयार व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया अशी पुस्ती त्यांनी जोडली. भाजपाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि जगभर साजरा होणारी गुढी पाडवा शोभायात्रा भाजपा कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून प्रथम सुरु झाली हेच आमचे मराठी भाषेबाबतचे अनेकवचन असल्याचे चव्हाण म्हणाले.