मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:08 IST2025-12-31T14:07:30+5:302025-12-31T14:08:16+5:30
Mumbai Municipal Corporation Election: मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी झालेल्या गडबडीचा मोठा फटका भाजपा-शिंदेसेना महायुतीच्या उमेदवारांना बसला आहे.

मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा आणि एबी फॉर्मचं वाटप अखेरपर्यंत लांबवले होते. त्यामुळे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश ठिकाणी एबी फॉर्म मिळवून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची तारांबळ उडालेली दिसून आली. दरम्यान, मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी झालेल्या गडबडीचा मोठा फटका भाजपा-शिंदेसेना महायुतीच्या उमेदवारांना बसला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक २१२ मध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळालेली असतानाही भाजपाच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरता आला नाही. तर प्रभाग क्रमांक २११ मध्येही शिंदेसेनेच्या उमेदवारासोबत असाच प्रकार घडला. त्यामुळे मुंबईमध्ये मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाने प्रभाग क्रमांक २१२ मधून मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. त्यानंतर खामकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात पोहोचल्या तेव्हा १५ मिनिटे उशीर झाला होता. त्यामुळे खामकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. केवळ १५ मिनिटे उशीर झाल्याने खामकर यांची उमेदवारी हुकली आणि भाजपाची एक जागा कमी झाली.
भाजपाने एबी फॉर्म दिल्यानंतर मंदाकिनी खामकर ह्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बँकेत उघडाव्या लागणाऱ्या नव्या बँक खात्यासाठी बँकेत गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांना खाते उघडण्यास बराच वेळ लागला. अखेरीस खामकर ह्या खाते उघडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या तेव्हा पाच वाजून गेले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पक्षाचं तिकीट असूनही निवडणूक लढवण्याची मंदाकिनी खामकर यांची संधी हुकली.
तर प्रभाग क्रमांक २११ मध्ये शिंदेसेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज हा कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याने फेटाळण्यात आला. त्यामुळे येथील लढतीमधूनही महायुती बाद झाली आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच दोन प्रभागांमधून महायुती बाद झाली आहे.