फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:01 IST2026-01-08T12:00:18+5:302026-01-08T12:01:00+5:30
BMC Elections 2026, Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांवर भाष्य केले. तसेच मुंबईला ट्रॅफिक आणि खड्डेमुक्त करण्यासाठी सरकारचा काय 'रोडमॅप' आहे, हे स्पष्ट केले.

फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन
मुंबई: "२०२२ मध्ये जेव्हा आम्ही 'गाडी पलटी' केली, तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. मी शब्दाचा पक्का आहे; जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते तर नक्कीच करतो," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाची पद्धत आणि राजकीय प्रवासावर भाष्य केले.
शिंदे यांनी त्यांनी अंबरनाथमधील पेच, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध आणि मुंबईच्या विकासावर रोखठोक मते मांडली. आजतकच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अंबरनाथमध्ये शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, "मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्षांशी बोललो आहे. तिथे जे घडलं ते विचारधारेला धरून नाही. पण मी खुर्चीसाठी लढणारा माणूस नाही, सत्ता महायुतीकडेच आहे ना, हे महत्त्वाचे." तसेच आमच्यात कोल्ड वॉर असल्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मी जुने मित्र आहोत. मी मुख्यमंत्री असतानाही त्यांना मुख्यमंत्रीच समजायचो आणि आजही आम्ही एकाच अजेंड्यावर काम करतोय, तो म्हणजे राज्याचा विकास," असे म्हणत त्यांनी मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
तसेच बिहारच्या निवडणुकीनंतर भाजपने जास्त जागा जिंकूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केले आहे, मग महाराष्ट्रात पुन्हा चर्चा होऊ शकतात का, असा सवाल शिंदे यांना करण्यात आला. यावर शिंदे यांनी महाराष्ट्रात आधीच सरकार बनलेले आहे. मी खुर्चीसाठी हपापलेला नाही, आम्ही राज्याच्या भल्यासाठी एकत्र काम करण्याची भूमिका घेतलेली आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाकरेंच्या नावावर मौन
उद्धव ठाकरेंवर थेट नाव घेऊन टीका करणे त्यांनी टाळले, पण "मी मेहनत करणारा माणूस आहे, कारणे देणारा नाही," असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. मुंबई अदानीच्या घशात घातली या आरोपावर आधीच्या कंपनीकडून काढून घेऊन अदानीच्या फाईलवर सही कोणी केली, हे त्यांना विचारा असे शिंदे यांनी सांगितले.
मुंबईला खड्डेमुक्त आणि ट्रॅफिकमुक्त करण्याचा वादा
मुंबईच्या समस्यांवर बोलताना शिंदे यांनी मुंबईला खड्डेमुक्त आणि ट्रॅफिकमुक्त करण्यात येत असल्याचे सांगितले. बांद्रा-वर्सोवा सी-लिंक आता विरारपर्यंत जाणार आहे. बीकेसी-कुर्ला अंडरग्राउंड टनल आणि बोरिवली टनलचे काम सुरू आहे. छेडानगर ते साकेत एलिवेटेड रोड आणि पॉड टॅक्सीचे नियोजन आहे, असे सांगितले.