३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:32 IST2025-12-30T11:32:15+5:302025-12-30T11:32:57+5:30
सध्याच्या काळात काही निर्णयांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे असं प्रकाश मोटे यांनी म्हटलं.

३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष अधिकृतपणे उमेदवारांना एबी फॉर्म देत आहे. त्यात ज्या इच्छुकांना पक्षाने उमेदवारी दिली नाही अशांची नाराजीही उघडपणे समोर येत आहे. मुंबईत सर्वच पक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्यात प्रत्येकजण आपापल्या परीने ही नाराजी व्यक्त करत आहे. सोमवारी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली तर दुसरीकडे मुलुंड येथील भाजपा पदाधिकाऱ्याने पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना खुले पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे.
मुलुंड मध्य विधानसभेतील भाजपाचे महामंत्री प्रकाश मोटे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, गेल्या ३२ वर्षाहून अधिक काळ मी भारतीय जनता पार्टीत एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले. पक्षाची विचारधारा, संघटनेची शिस्त आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हेच माझ्या राजकीय प्रवासाचे अधिष्ठान राहिले आहे. मुलुंडमध्ये संघटना उभारणीपासून ते प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अडचणीपर्यंत पक्षकार्य हेच माझे जीवन होते असं त्यांनी भावना मांडली.
तसेच कोणत्याही पदासाठी नव्हे तर जनतेसाठी आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मात्र सध्याच्या काळात काही निर्णयांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ही बाब मला अस्वस्थ करते. या परिस्थितीत आत्मसन्मान आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाची बाजू जपत कोणताही वैयक्तिक आकस न ठेवता मी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि माझ्याकडे असलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत आहे असं प्रकाश मोटे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पद जाऊ शकते, पण तत्व नाही. ३२ वर्षांची निष्ठा, संघटनासाठी दिलेलं आयुष्य आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. स्वाभिमान जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. मी थांबतोय, पण माझी लढाई मूल्यांसाठी सुरूच आहे. स्वत:च्या तत्वांशी प्रामाणिक राहण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. संघर्षातून आलोय, म्हणूनच अन्यायासमोर कधी वाकणार नाही असंही प्रकाश मोटे यांनी स्पष्ट केले आहे.