Join us
Daily Top 2Weekly Top 5

दादरमध्ये ठाकरेच! सदा सरवणकर फॅमिलीला बसावं लागणार घरी; दोन्ही मुलांचा पराभव जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 21:07 IST

ज्याने बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला त्याला गाडायचे होते. ते गाडण्याचं काम मतदारांनी केले असं आमदार महेश सावंत यांनी म्हटलं. 

मुंबई - महापालिकेचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा महायुतीला जनतेने कौल दिला आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला दादर-माहिमकरांनी साथ दिली आहे. मुंबईतल्या निकालांमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदेसेनेचे नेते सदा सरवणकर यांचा विधानसभेला पराभव झाला होता. त्यानंतर आता मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर गुरव यांचाही पराभव झाला आहे. 

वार्ड क्रमांक १९१ मधून सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर उभी होती. मात्र या वार्डात उद्धवसेनेच्या विखाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्याशिवाय वार्ड क्रमांक १९४ मध्ये उद्धवसेनेने निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती. या वार्डात तिथले विद्यमान नगरसेवक समाधान सरवणकर यांना भाजपा शिंदेसेनेने तिकीट दिले होते. मात्र या वार्डात निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा पराभव केला आहे. या निकालानंतर निशिकांत शिंदे म्हणाले की, हा माझा विजय नाही तर दादर प्रभादेवीचा विजय आहे. शिवसेना-मनसेचा विजय आहे. मला भूतकाळात जायचे नाही. निष्ठा ही निष्ठाच असते. ठाकरे हे ठाकरेच असतात असं त्यांनी सांगितले.

तर माझ्या डोळ्यात आज आनंदाश्रू आहेत. गेली साडे तीन चार वर्ष मी वाट पाहत होतो. समाधान सरवणकरला पाडणार असा आमचा पण होता. समोर पैशांचा पाऊस पडत होता तरीही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत केली होती. मी विभागप्रमुख झालो होतो तेव्हा शपथ घेतली होती भविष्यात दादर माहिममधून सरवणकर नाव पुसून टाकणार आहे. त्याची सुरुवात मी स्वत: केली. ज्याचा उदय प्रभादेवीत झाला त्याचा अस्त प्रभादेवीतच व्हायला हवं असं मी जनतेला म्हटलं होते. ज्याने बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला त्याला गाडायचे होते. ते गाडण्याचं काम मतदारांनी केले असं आमदार महेश सावंत यांनी म्हटलं. 

विधानसभेत सदा सरवणकरांचा पराभव

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना भाजपा शिंदेसेनेचे उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मनसे स्वतंत्र लढत होती. मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली. याठिकाणी महेश सावंत जायंट किलर ठरले. त्यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केला. त्यामुळे विधानसभेला सदा सरवणकर आणि महापालिकेत समाधान सरवणकर, प्रिया सरवणकर यांचा पराभव दादरमध्ये झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray's Dominance in Dadar: Sarvankar Family Faces Setbacks in Elections

Web Summary : Uddhav Thackeray's faction triumphs in Dadar, Mumbai, with the Sarvankar family facing defeats. Following Sada Sarvankar's assembly loss, his children, Samadhan and Priya, also lost in the municipal elections, marking a significant setback for the Shinde-BJP alliance.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६उद्धव ठाकरेसदा सरवणकरमनसे