BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:28 IST2025-11-16T14:24:18+5:302025-11-16T14:28:32+5:30
BMC Election 2025: २०१७ मध्ये निवडून आलेल्या ६४ तर २०१७ पूर्वीच्या ६४ अशा एकूण १२८ माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.

BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी सुमारे १५० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. दुसरीकडे, विविध पक्षांच्या १२८ माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा संधी मिळावी, यासाठी किमान १२५ जागांवर दावा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या जागावाटप बैठकीत शिंदेसेनेकडून केला जाणार आहे.
२०१७ मध्ये निवडून आलेल्या ६४ तर २०१७ पूर्वीच्या ६४ अशा एकूण १२८ माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यात उद्धवसेनेचे सर्वाधिक ७९ माजी नगरसेवक आहेत. काँग्रेसचे २६ जणही शिंदेसेनेत आले असून राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्ष, अभासे या पक्षांच्या माजी नगरसेवकांचा यात समावेश आहे.
शिंदेसेनेने माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळावी तसेच महायुतीच्या नेत्यांसोबत मुंबईतील जागावाटपाची चर्चा करण्यापूर्वी २१ जणांची समिती नेमून २२७ प्रभागांचा अभ्यास केला आहे. त्याआधारेच १२५ जागांची मागणी करण्यात येणार आहे.
निकष काय?
वॉर्ड ८१ चे तत्कालीन भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी शिंदेसेनेतून विधानसभा निवडणूक लढविली आणि जिंकलेही. त्यांच्या पत्नी वॉर्ड ७६ मधून विजयी झाल्या होत्या. दाेन्ही जागा तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या असूनही पटेल आमदार झाल्याने त्या जागांवरही शिंदेसेना दावा करणार आहे. याच निकषाने माजी आमदार, खासदार यांच्या जागावरही दावा केला जाईल.
आतापर्यंत शिंदेसेनेत प्रवेश केलेले सर्वपक्षीय माजी नगरसेवक
| कुठून आले (मूळ पक्ष/गट) | २०१७-२०२२ या कालावधीत आलेले सदस्य | २०१७ पूर्वी आलेले सदस्य | एकूण सदस्य संख्या |
| उद्धवसेना | ४६ | ३३ | ७९ |
| काँग्रेस | ६ | २० | २६ |
| राष्ट्रवादी | ५ | २ | ७ |
| भाजप | २ | ० | २ |
| एमआयएम | २ | ० | २ |
| सपा (समाजवादी पक्ष) | २ | १ | ३ |
| मनसे | १ | ५ | ६ |
| अभासे | ० | १ | १ |
| अपक्ष | ० | २ | २ |
| एकूण | ६४ | ६४ | १२८ |
२०१७ मध्ये ८२ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. आगामी निवडणुकीतही मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, महायुतीच्या मिळून १५० हून अधिक जागा आम्ही जिंकू. सहकारी पक्षांसोबत जागावाटपाची बोलणी लवकरच सुरू होईल. जिंकण्याची क्षमता या आधारावर कुणी किती जागा लढायच्या याचा निर्णय होईल.- आ. अमित साटम, अध्यक्ष, मुंबई भाजप
मुंबईत ३६ विभागप्रमुख नेमून पक्षाने संघटन मजबूत केले आहे. माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देऊन त्यांनाही पालिकेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे पक्षाला किती जागा मिळाव्यात, याचा निर्णय महायुतीच्या जागावाटप बैठकीत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. आमचा मित्रपक्ष आमच्यावर अन्याय करणार नाही, याची खात्री आहे.- शीतल म्हात्रे, प्रवक्त्या शिंदेसेना