मानखुर्द परिसरात मुस्लीम मते समाजवादीकडून एमआयएमकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:28 IST2026-01-17T13:28:56+5:302026-01-17T13:28:56+5:30
समाजवादीला जोरदार धक्का

मानखुर्द परिसरात मुस्लीम मते समाजवादीकडून एमआयएमकडे
मुंबई: मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला असून, एमआयएमने जोरदार मुसंडी मारली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी व अकबर ओवेसी यांच्या सभांमुळे येथील मतदार एमआयएमकडे वळल्याचे चित्र आहे. आझमींविरोधात मतदारांनी एकजुटीने मतदान केल्याचे समोर आले, तर एक जागा भाजपचे नवनाथ बन यांनी शिंदेसेनेकडून हिसकावून घेतली.
अणुशक्तीनगर मतदारसंघात तीन जागांवर शिंदेसेना विजयी झाली, तर एमआयएमला एका जागेवर विजय मिळाला. प्रभाग १४५ मध्ये एमआयएम खैरुन्निसा हुसेन विजयी झाल्या. प्रभाग १४६ मध्ये शिंदेसेनेच्या समृद्धी काते, प्रभाग १४७ मध्ये शिंदेसेनेच्या प्रज्ञा सदाफुले विजयी झाल्या.
वांद्रे पश्चिम मतदारसंघावर भाजपने वर्चस्व राखले
वांद्रे पश्चिम मतदारसंघावर भाजपने आपले वर्चस्व राखले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी याठिकाणी आपले नेतृत्व कायम ठेवले. प्रभाग क्रमांक भाजपच्या २७ मधून हेतल गाला, प्रभाग क्रमांक ९८ मधून अलका केरकर विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक १०० मधून भाजपच्या स्वप्ना म्हात्रे विजयी झाल्या. उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात उद्धवसेनेने ताकद कायम ठेवली आहे. प्रभाग क्रमांक ८७ मधून उद्धवसेनेच्या पूजा महाडेश्वर, प्रभाग क्रमांक ८८ मधून उद्धवसेनेच्या श्रवरी परब, प्रभाग क्रमांक ९३ मधून उद्धवसेनेच्या रोहिणी कांबळे, प्रभाग क्रमांक ९४ मधून उद्धवसेनेच्या प्रज्ञा भूतकर व प्रभाग २२ मधून काँग्रेसचे मो. इब्राहिम कुरेशी यांनी विजय मिळवला.