"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 06:31 IST2026-01-12T06:31:05+5:302026-01-12T06:31:59+5:30
२० वर्षांनी राज-उद्धव यांची शिवाजी पार्कवर एकत्र सभा

"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
मुंबई : मला आता भीती वाटते मुंबईचे परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनात डाव आहे का ? तो अण्णामलाई आला त्याला धन्यवाद द्यायचे आहेत, भाजपच्या मनातले काळे आहे ते तो बोलून गेला. असाच लोकसभेच्या वेळी अबकी बार ४०० पारचा नारा दिला होता, त्यांच्याच खासदाराने बिंग फोडलं होते आम्हाला संविधान बदलायला ४०० पार हवे आहेत. आज मुंबईत जे प्रदूषण बघतो आहे ते भ्रष्टाचाराचे प्रदूषण आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील उद्धवसेना-मनसे-शरद पवार गटाच्या संयुक्त प्रचारसभेत बोलताना केली.
२५ वर्षात शिवसेनेने केलेली कामे आणि फक्त चार वर्षात यांनी धुवून टाकलेली मुंबई हे आजचे चित्र आहे. आपण जगायचे कसे हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे ठाकरे म्हणाले.
आताचा भाजप आणि पूर्वीच्या जनसंघावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, हे लढणारे नाहीत, हे घरे पेटवून पोळ्या भाजणारे आहेत. आगी लावायच्या, आपलीच माणसे आपल्यावर सोडायची, रक्तपात झाला तर आपल्यात होईल, ते तिकडे पोळ्या भाजणार.
ठाकरे आणि पवार ही दोन नावे यांना पुसून टाकायची आहेत. हे एकदा संपले की मराठी माणूस उभाच राहू शकत नाही. मराठी माणूस सहनशील, दयावान आहे. पण शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवण आहे, एक तर कुणावर वार करू नका, पण कुणी हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका, असेही ते म्हणाले.
गिफ्ट सिटी गुजरातला कोणी नेली
भाजपच्या होर्डिंगवर असणाऱ्या दोन चेहऱ्यांचे मुंबईसाठी योगदान काय?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातला कोणी नेली? उद्योगधंदे गुजरातला कोणी नेले हे त्यांचे योगदान आहे. खरी शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष इथे असून तिकडे टोळ्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवाज काढत आदित्य यांनी मिमिक्रीही केली. काकांचा वारसा असल्याचे सांगत कोस्टल रोड उद्घाटनाचे फोटो दाखवले.