मुंबई - महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरायचा आता काही तास शिल्लक आहेत. त्यात प्रत्येक पक्षात नाराजीनाट्य दिसून येत आहे. अनेक इच्छुक उमेदवार पक्षाकडून तिकीटाची आस लावून बसले आहेत. त्यात बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी उमेदवाराला थेट एबी फॉर्म देत आहेत. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. त्यात राज ठाकरे यांच्या मनसेकडून पहिला उमेदवार घोषित झाला आहे.
मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. याबाबत मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार म्हणाले की, माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही कामाची पोचपावती मिळाली आहे. राज ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो नक्कीच मी सार्थ ठरवेल. मी १०० टक्के विजयी होणार आहे. माझ्यासोबत आणि पक्षाचे अनेक उमेदवार बहुमताने निवडून येतील याची खात्री आम्हाला आहे असा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राज ठाकरे हे मनसेच्या सगळ्याच इच्छुकांसाठी आग्रही होते. परंतु मला पहिली संधी मिळाली आणि पहिला AB फॉर्म माझ्या हाती साहेबांनी दिला याचा मला खूप आनंद झाला आहे असंही मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं. यशवंत किल्लेदार यांना मनसे-उद्धवसेना युतीकडून वार्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. १९२ वार्डात सध्या विद्यमान ठाकरे गटाचे नगरसेवक होते. मात्र मनसे-उद्धवसेना युती या जागेवरून दोन्ही पक्षात प्रचंड रस्सीखेच झाली आणि अखेर हा वार्ड मनसेला मिळाला आहे. त्याठिकाणी पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना मनसेने तिकीट दिली आहे.
कोण आहेत यशवंत किल्लेदार?
यशवंत किल्लेदार हे दादर माहिम येथील मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. विविध सामाजिक विषयांवरील आंदोलनात ते सक्रीय सहभागी असतात. मनसेच्या स्थापनेवेळी ते या विभागाचे अध्यक्ष होते. यशवंत किल्लेदार मागील २ महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना तिकीट मिळाले नव्हते. मात्र तरीही किल्लेदार यांनी नाराजी व्यक्त न करता मनसेत सक्रीय राहिले. प्रकाश पाटणकर, संदीप देशपांडे यांना नगरसेवक बनवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. कालांतराने प्रकाश पाटणकर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेले तर संदीप देशपांडे यांना पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. मात्र अखेर यशवंत किल्लेदार यांना निष्ठेचे फळ मिळाले आणि उद्धवसेना-मनसे युतीचे ते उमेदवार बनले आहेत.
Web Summary : MNS declares Yashwant Killedar as its first candidate for upcoming elections. Raj Thackeray handed him the AB form. Killedar to contest from ward 192 as part of MNS-Uddhav Sena alliance.
Web Summary : मनसे ने यशवंत किल्लेदार को आगामी चुनावों के लिए अपना पहला उम्मीदवार घोषित किया। राज ठाकरे ने उन्हें एबी फॉर्म सौंपा। किल्लेदार मनसे-उद्धव सेना गठबंधन के हिस्से के रूप में वार्ड 192 से चुनाव लड़ेंगे।