घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:59 IST2025-12-19T12:58:44+5:302025-12-19T12:59:27+5:30
जो जीव तोडून काम करतोय, सर्वस्व अर्पण करतोय त्याच्या विभागात जर का त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
मुंबई- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी अमराठी मुद्द्यावरून ठाकरे बंधू आणि भाजपा आमनेसामने आल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी शहरात निनावी पोस्टर झळकले होते. त्यात मराठी माणसाला मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आले होते. या पोस्टरला प्रत्युत्तर देत दुसरे एक निनावी बॅनर मुंबईत झळकले. भाजपा नेत्यांनी आपापल्या सोशल मीडियावर हे बॅनर पोस्ट करत ठाकरे बंधू यांच्यावर टीका केली होती. या बॅनरवर BMC is Not Family Business असा उल्लेख करून ठाकरेंवर टीका करण्यात आली होती. मात्र आता याच वाक्याचा आधार घेत भाजपा मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात विवेकानंद गुप्ता म्हणतात की, भाजपाच्या मुंबई व्हॉट्सअपवर मी आपलं स्टेटमेंट वाचले, BMC Election in Not Family Business मी आपल्या वक्तव्याचे स्वागत करतो. ही अत्यंत चांगली घोषणा असून कार्यकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आदर्शवत आहे. वर्षानुवर्षे कार्यकर्ते काम करतात, जिद्दीने पक्षाच्या कामात उतरतात. त्यालाही काही ध्येय असतात. काही इच्छा असतात. आकांक्षा असतात, अपेक्षा असतात. कार्यकर्ता राजकारणात काम करतो त्याला काही ना काही तरी सन्मानाचे पद मिळाले पाहिजे अशी त्याची तीव्र इच्छा असते असं त्यांनी म्हटलं.
तसेच जो जीव तोडून काम करतोय, सर्वस्व अर्पण करतोय त्याच्या विभागात जर का त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते. मग येणारी निराशा खूप खूप वाईट आणि विचित्र असते. आपला पक्ष कार्यकर्ताभिमुख आहोत, आपला पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यांच्यासाठीच पक्षासाठी कार्यकर्ते काम करतात आणि पक्षांनीसुद्धा कार्यकर्त्यांसाठीच काम केले पाहिजे या मताचा मी आहे. म्हणूनच आपण कुठल्याही मोहाला बळी न पडता, दबावाला बळी न पडता कोणत्याही नेत्याच्या इच्छेला, निर्देशाला बळी न पडता जो कार्यकर्ता आहे त्याला तिकीट द्यावं. त्याच्या कार्याला न्याय द्यावा अशी मागणी करत या निवडणुकीत फक्त कार्यकर्ता आणि कार्यकर्ताच निवडणूक लढेवल अशी अपेक्षा विवेकानंद गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. तिकिट वाटपात नेत्यांच्या मुलांना, पत्नीला उमेदवारी देण्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.