'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:17 IST2025-12-31T13:17:23+5:302025-12-31T13:17:56+5:30
१९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के मुस्लीम लोकसंख्या झाली. २०२५ मध्ये मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के मुंबईत आहेत असं सोमय्या यांनी सांगितले.

'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी शिवसेनेचा रंग भगवा होता आता उद्धव ठाकरेंच्या वेळी रंग हिरवा झाला आहे. मुस्लीम मराठी युती करूया असं आतून चालले आहे. मुंबईतील मराठी हिंदू असेल, गुजराती असेल किंवा हिंदी भाषिक हिंदू असेल हा मुंबईतला हिंदू 'मुस्लीम मुंबई' करण्याचं कटकारस्थान यशस्वी होऊ देणार नाही असं सांगत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, मराठी मुंबई आता मुस्लीम मुंबई झाली आहे. किरीट सोमय्या नव्हे, अमित शाह नाही तर टाटा इन्स्टिट्यूट सायन्सचा रिपोर्ट आहे. २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम ३० टक्क्यांच्या वर लोकसंख्या जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. उद्धव ठाकरेंचे सहकारी एमआयएम पक्ष सांगतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखावाली असावी हे आमचे लक्ष्य आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावर एक शब्द बोलत नाही. मुंबईत बांगलादेशींचं इतक्या मोठ्या संख्येने अतिक्रमण आहे त्यावर बोलत नाही. मुंबईतून माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात म्हणून मुस्लीम मुंबई बनवण्याचं कटकारस्थान एमआयएम असेल, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे असेल परंतु हे महायुती यशस्वी होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच तुम्ही किती वर्ष लोकांची फसवणूक करणार आहात, आता मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आले. मराठी मुंबई म्हणायचे आणि मुस्लीम मुंबई करण्याच्या कारस्थानात दोन्ही ठाकरे सहभागी झालेत. माझ्याकडे सेन्ससचे आकडे आहेत. १९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के मुस्लीम लोकसंख्या झाली. २०२५ मध्ये मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के मुंबईत आहेत. हेच उद्धव ठाकरे लोकसभेला व्होट जिहाद करत होते. धारावीत ठाकरे यांनी २५ हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशिदीसाठी पुढाकार घेतला असा आरोप सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
मराठी असो वा उत्तर भारतीय तो हिंदूच...
दरम्यान, १९९२ साली बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या नेतृत्वामुळे मुंबई वाचली मात्र उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांची शरणागती स्वीकारली आहे. उत्तर भारतीय असो, गुजराती असो, राजस्थानी असो हिंदू हा हिंदू आहे. उद्धव ठाकरेंना मुंबईत महापौर नाही तर महापालिकेतील माफिया कंत्राटदारावर त्यांचे नेतृत्व हवे आहे. भाजपाचे लक्ष्य मुंबईचा विकास करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जात भाजपाने पाहिली नाही. त्यामुळे मुस्लीम मराठी युती करण्याचं कटकारस्थान मुंबईकर यशस्वी होऊ देणार नाहीत. मुस्लीम जन्मदर वाढतोय, बांगलादेशी आक्रमण गेल्या काही वर्षात उग्र झाले आहे. जगातील मोठ मोठी राजधानी शहरे आहेत. त्याठिकाणी षडयंत्र सुरू आहे. तुम्ही लंडन बघा, न्यूयॉर्कचा महापौर पाहा. बल्गेरियातही तेच सुरू आहे. बांगलादेशात हिंदूंना मारले जाते आणि इथं बांगलादेशी घुसवतायेत. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला अधिक जागरूक व्हावे लागेल. २०२६ मध्ये माझे लक्ष घुसखोर बांगलादेशी आहेत त्यांच्यावर असणार आहे असंही सोमय्या यांनी सांगितले.