Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:50 IST

कोण कुणाला भेटते यावर आम्ही भाष्य करणार नाही. एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊ द्या त्यांच्यावर १०० प्रश्नांचा पाऊस पाडू. ज्यांनी २५ वर्ष महापालिकेत भ्रष्टाचार केला त्या उबाठा आणि त्यांच्यासोबत जे जातील त्यांना पराभूत करण्याचा मुहूर्त मराठी माणसाने काढला आहे असं शेलारांनी सांगितले.

मुंबई - आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. १५० प्लस महायुतीचे नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा आहे असं विधान भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिंदेसेनेची संयुक्त बैठक आज पार पडली. दादरच्या भाजपा कार्यालयात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या जागांचा आढावा घेतला. या बैठकीत भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलार आणि शिंदेसेनेकडून मंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे तसेच इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जागावाटपाचा प्रश्न विचारताच आशिष शेलार म्हणाले की, होय, आमचा फॉर्म्युला ठरला अन् आकडाही ठरला. १५० प्लस महायुतीचे नगरसेवक महापालिकेत निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला आणि हा आमचा निर्णय आहे. आज आमची चर्चा झाली. आम्ही दोघेही मिळून आरपीयसह कुणी कुठे लढल्यावर १५० प्लस आम्ही जाऊ हा आकडा ठरवण्यासाठी अभ्यास बैठक आज झाली. १-२ दिवसांत पुन्हा बैठक घेऊन दोन्ही पक्ष किती जागा लढतील हे आम्ही ठरवू असं त्यांनी सांगितले. 

तर  ज्यांच्याकडे मुद्दे नाही ते असत्य, खोटे भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत. मुंबई मराठी माणसांची आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे तोपर्यंत कुणीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही. जो कुणी ही भूमिका घेईल त्याविरोधात भाजपा राहिली. जो ही भूमिका मांडेल त्याच्याशी संघर्ष करू. आता जे बोलतायेत मतदानासाठी भ्रम पसरवातेयत. त्यामुळे ते असत्य आणि खोटे बोलत आहेत. मुंबई महापौर मराठी असेल यात शंका नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा महापौर कुठल्या मोहल्ल्यातून येईल हे घोषित करावे असा टोला शेलारांनी लगावला आहे. 

दरम्यान, कोण कुणाला भेटते यावर आम्ही भाष्य करणार नाही. एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊ द्या त्यांच्यावर १०० प्रश्नांचा पाऊस पाडू. ज्यांनी २५ वर्ष महापालिकेत भ्रष्टाचार केला त्या उबाठा आणि त्यांच्यासोबत जे जातील त्यांना पराभूत करण्याचा मुहूर्त मराठी माणसाने काढला आहे. ही निवडणूक मुंबईकरांची आहे. कोण कुणाशी युती करते हा त्यांचा भाग आहे परंतु आम्ही मुंबईकरांच्या हिताची लढाई लढू. काँग्रेससोबत नाही म्हणून संजय राऊतांना घाम फुटला आहे. अख्खी उबाठा तोंडावर रुमाल लावून बसले आहेत. काही पक्ष आणि काही नेते केवळ पोस्टरवर राहिलेत. लबाडीत पोस्टर लावून जनतेत भ्रम पसरवला जात आहे. पराभवाची नांदीच या पोस्टरमधून देत आहेत. मुंबईतील मराठी माणसाच्या स्वप्नाचा, हक्काचा काहीच विचार त्यात नाही. मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला आहे. २५ वर्ष ज्यांनी खा खा खाल्लं, तरी पोट भरले नाही अशा कंत्राटदार प्रेमी उबाठा सेना आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्यांना पराभूत करण्याचा निर्णय मुंबईकरांनी ठरवला आहे असं सांगत शेलारांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. 

राष्ट्रवादीसोबत युती नाही

नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईत नेतृत्व करत आहेत. त्यामुळे अशा राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करू शकत नाही. ही आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे. शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले त्यांनाही हेच सांगितले आहे अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena alliance finalizes seat-sharing formula for Mumbai elections.

Web Summary : The BJP-Shinde Sena alliance has finalized its seat-sharing formula for the upcoming Mumbai municipal elections, aiming for 150+ corporators. Ashish Shelar criticized the opposition and asserted Mumbai's Marathi identity, ruling out alliance with NCP led by Nawab Malik.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूकमुंबई महापालिका निवडणूक २०२६आशीष शेलारउद्धव ठाकरेराज ठाकरेशिवसेना