BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 00:47 IST2026-01-02T00:44:07+5:302026-01-02T00:47:06+5:30
Raj Thackeray News: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.

BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं?
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर सडकून टीका केली. "राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी," अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणांवर टोलेबाजी केली.
राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो, म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही,…
— Ramdas Athawale (@RamdasAthawale) January 1, 2026
रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, राज ठाकरेंची भाषणं ऐकायला भारी असतात, मात्र प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत त्यांची पाटी कोरी आहे. "आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना प्रत्यक्ष भेटतो, त्यांच्या सुख-दुःखात धावून जातो. त्यामुळेच मुंबईकरांच्या हृदयात आमचे स्थान अढळ आहे," असा दावा आठवलेंनी केला आहे. केवळ गर्दी जमवून समस्या सुटत नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आठवले पुढे म्हणाले की, "राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही. ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यांचे राजकारण आता संपत आले आहे." विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांना हे गणित कसे काय दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी हा हल्लाबोल केला. "तुम्ही कितीही युती करा, पण आगामी निवडणुकीत मुंबईत तुमची विजयाची पणती पेटणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.