“पक्षाने काय कमी केले? किती स्वार्थी हे दिसून आले”; यशवंत किल्लेदारांची संतोष धुरींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:20 IST2026-01-07T09:19:55+5:302026-01-07T09:20:39+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील पुतळ्यास मनसैनिक व शिवसैनिकांकडून ९५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

“पक्षाने काय कमी केले? किती स्वार्थी हे दिसून आले”; यशवंत किल्लेदारांची संतोष धुरींवर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून मनसे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पक्षाने त्यांना काय कमी दिले होते का? असा सवाल केला. किरकोळ कारणांसाठी नाराज होत असतील तर त्यांची मानसिकता दिसून येते. ते किती स्वार्थी आहेत हे दिसून आले, अशी टीकाही केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील पुतळ्यास मनसैनिक व शिवसैनिकांकडून ९५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना किल्लेदार म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे पक्षाने त्यांना मोठे केले. नावारूपाला आणले. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.
राज यांच्यासोबत आम्ही इतकी वर्ष आहोत. अनेक निवडणुका आल्या. पण, दुसऱ्याला संधी मिळण्यासाठी मी ही नेहमी माघार घेतली होती. मनात नाराजी असली तरी ज्या पक्षाने नाव दिले, मोठे केले. समाजात प्रतिमा उभी केली हे विसरू शकत नाही. मात्र, काहीजण, नाव, पैशांसाठी दुसरीकडे चालले आहेत. राजकीय नीतिमत्ता राहिली नाही. भाजप व शिंदेसेना पैशांचे आमिष दाखवून इतर पक्षांतील नेत्यांना फोडायला बसली आहे, अशी टीका किल्लेदार यांनी केली.