निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:07 IST2026-01-15T13:06:19+5:302026-01-15T13:07:26+5:30
Nivedita Saraf Voting News : विलेपार्ले येथे मतदानासाठी गेलेल्या निवेदिता सराफ यांना मतदार यादीतील गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागला. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी केली सडकून टीका.

निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज विलेपार्ले येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदार यादीतील गोंधळामुळे मतदानासाठी तब्बल एक तास केंद्रावरून केंद्रावर चकरा माराव्या लागल्या. "निवडणूक आयोगाचा कारभार अत्यंत ढिसाळ आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मी मतदान केंद्रावर गेले तेव्हा तेथील मतदार यादीत माझे नावच नव्हते. मला २५ नंबरला जाण्यास सांगण्यात आले. तिथे नाव सापडले. तुम्ही सगळ्या सोसायट्यांचे गट पाडलेले आहेत, त्या गटातील मतदार या मतदान केंद्रात येऊन मतदान करतील असे ठरविले आहे. मग का आमच्या बिल्डिंगची नावे नाहीत. माझे नाव आहे, पण सिरीज नंबरच लिहिलेला नाही. दुसरीकडे २५ नंबर असल्याचे सापडले. मी तिकडे गेले पण तोवर निवडणूक कर्मचारी गेली होती, अशी टीका सराफ यांनी केली. मोबाईल आतमध्ये नेऊ देत नाही, नाहीतर फोटो काढला असता, असे त्या म्हणाल्या.
निवडणूक आयोगाच्या या नियोजनाअभावी अनेक सामान्य मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आज मुंबईत पाहायला मिळाले. एवढेच नाही तर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि कुटुंबीयांचे देखील मतदार यादीत नाव नव्हते. तासभर शोधल्यानंतर त्यांचे नाव सापडले आणि त्यांनी मतदान केले.