“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:47 IST2025-12-28T14:46:30+5:302025-12-28T14:47:10+5:30
Uddhav Thackeray News: भाजपाने आपला वापर करून घेतला. भाजपाचा वाईट अनुभव आला आहे. मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इतकी वर्षे लढलो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray News: भाजपाचा वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे काही करून आता भाजपाला हरवायचे आहे. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल; पण, तुम्ही तुमची निष्ठा विकू नका. भाजपाने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले असताना आपण जर तुझे माझे करत बसलो तर माझे म्हणणे आहे की, लढाई न लढलेले बरे. मुंबई आमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असा निर्धार उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अद्यापही जागावाटपावर खल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम असून, मातोश्रीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असला तरी वरळी, शिवडी, माहीम, विक्रोळी आणि भांडुप या पाच विधानसभा मतदारसंघांतील पालिका प्रभागाच्या जागांवरून दोन्ही पक्षांचे जागावाटप रखडले आहे. दोन्ही पक्षांमध्ये नाराजी उफाळून येऊ लागल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या जनसेवेबाबत सविस्तर माहिती देणारी पुस्तिका शिवसेना भवन येथे प्रकाशित केली. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख , आमदार, खासदार यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.
आजपर्यंत भाजपाने आपला उपयोग करून घेतला
मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इतकी वर्षे लढलो. मुंबई कोणीही हिसकावू शकले नाही. कोणीही ओळखत नव्हते, त्या भाजपाला आपण खेडोपाडी नेले. आम्ही ज्यांना मोठे केले आज तेच आमच्यावर वार करत आहेत. आजपर्यंत भाजपाने उपयोग करून घेतला. मला तुमच्यापैकी एकही माणूस फुटता कामा नये. तुम्ही माझ्या खुर्चीत बसून बघा आणि तुमच्यापैकी समोरील फक्त चार माणसे निवडून दाखवा. मी वाईटपणा घेतोच की, सर्व विभागप्रमुखांना सांगतो की, मी वाईटपणा घेतो… तुम्ही नका घेऊ. तुमच्याशी हे मी आगतिक होऊन बोलत नाही. मला २२७ लोकांची निवड करायची आहे. मला नाशिक, पुणे, ठाणे सगळीकडे पाहायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुंबईसाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपा किंवा तत्कालीन जनसंघाचा काडीमात्र संबंध नव्हता. मुंबई गुजरातला हवी होती, म्हणून त्यांनी संघर्ष केला. आजपर्यंत भाजपाने आपला दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आपण मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी मनसेशी युती केली आहे. युती असते, आघाडी होते, तेव्हा १०० टक्के आपल्या मनासारखे होत नाही. काही जागा आपल्या हक्काच्या असतात. परंतु, नाईलाजाने त्या सोडाव्या लागतात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.