“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:17 IST2025-12-19T17:14:59+5:302025-12-19T17:17:00+5:30
Uddhav Thackeray News: सातारा प्रकरणात ठाण्याची व्यक्ती आहे. आता भावाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री त्यांना पांघरूण घालत आहेत, हे विचित्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
Uddhav Thackeray News: योग्यवेळी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आपल्याकडे येत आहेत. सध्या देशात आणि राज्यात जो काही अंदाधुंद कारभार चालला आहे, तो भयानक आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जे काही सुरू आहे, ते आपण पाहात आहात. मीडियामध्ये सखोलपणे गोष्टी येत नसल्या, तरी सत्य काही लपून राहत नाही. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत. परंतु, मुख्यमंत्री त्यांना पांघरूण घालत आहेत, हे विचित्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मातोश्री या निवासस्थानी मीरा-भाईंदर येथील भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना महायुतीवर टीका केली. राजकारणासाठी माणसे लागतात, ही गोष्ट बरोबर असली, तरी गुंड माणसेही चालतील, ड्रग्जचा व्यवहार करणारेही चालतायत, ज्यांचे नाव ड्रग्ज व्यवहाराशी जोडले जात आहे, ती ठाण्याची व्यक्ती आहे. आता भावाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. हे कोणते राज्य आहे, कुणासाठी हे सगळे सुरू आहे, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
केंद्रीय मंत्र्यांकडेही निवेदन करणार आहोत, मग हे काय करतात ते बघुया
आधी झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात डान्स बारचे पुरावे बाहेर काढले, अवैध खाण उत्खननाचा विषय बाहेर काढला. सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी बाहेर काढल्या. आताही ड्रग्जचा जो कारखाना आहे, तो सुषमा अंधारे यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला. तरीही मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत. केंद्रीय मंत्र्यांकडेही निवेदन करणार आहोत, मग हे काय करतात ते बघुया, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील मुले नशेच्या आहारी जाणार असतील, तर अशी कामे करणारे आणि त्यांना वाचवणाऱ्यांना आपण मतदान करणार आहोत का, आपल्या मुला-बाळांचे आयुष्य त्यांच्या हाती देणार आहोत का, हा ज्याचा त्याने विचार करावा. अजूनही ज्यांचे डोळे उघडले नाहीत, त्यांचे डोळे आतातरी उघडतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.