राज ठाकरेंना एकाच दिवशी दोन धक्के; मनसेचे संतोष धुरी भाजपात तर राजा चौगुले शिंदेसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:13 IST2026-01-07T09:13:16+5:302026-01-07T09:13:16+5:30
मनसेचे ७-८ उमेदवारही निवडून येतील की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली.

राज ठाकरेंना एकाच दिवशी दोन धक्के; मनसेचे संतोष धुरी भाजपात तर राजा चौगुले शिंदेसेनेत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :राज ठाकरे यांच्या मनसेला मंगळवारी एकाच दिवशी दोन धक्के बसले. मनसेचे सरचिटणीस राजा चौगुले यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, तर दादरमधील माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मनसेला उद्धव ठाकरेंपुढे सरेंडर केल्याचा आरोप करीत धुरी यांनी, मनसेचे ७-८ उमेदवारही निवडून येतील की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली.
धुरी यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तर चौगुले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर ते म्हणाले, “आपण शिवसेनेतून २००६ मध्ये मनसेत आलो. अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. आता मनसे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटापुढे शरण गेली आहे. ज्यांच्यामुळे राज यांनी शिवसेना सोडली त्यांनीच आता मनसेचा ताबा घेतला आहे.”
वांद्र्यांच्या बंगल्यावरून सांगण्यात आले की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी कोणत्याही चर्चेत, प्रक्रियेत दिसता कामा नयेत, अशा परिस्थितीत पक्षात राहण्यात अर्थ नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे धुरी यांनी स्पष्ट केले.
धरसोड कार्यप्रणाली, पदे दिली पण अधिकार नाही, स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेणे यामुळे आपली घुसमट होत होती आणि शिंदेसेनेचे निवडणूक चिन्ह आमच्या हृदयाजवळचे असल्याने शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे राजा चौगुले यांनी सांगितले.