घाटकोपर पूर्वेत भाजपला हवे एकहाती वर्चस्व; पश्चिमेत मात्र ठाकरे बंधूंशी अटीतटीची लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:53 IST2026-01-12T13:52:46+5:302026-01-12T13:53:33+5:30
घाटकोपर पश्चिमेत मात्र भाजपसाठी अटीतटीची लढत आहे.

घाटकोपर पूर्वेत भाजपला हवे एकहाती वर्चस्व; पश्चिमेत मात्र ठाकरे बंधूंशी अटीतटीची लढत
मुंबई : घाटकोपर पूर्व विभागात मराठी मतदारांची संख्या जास्त असली तरी गुजराती समाजही येथे आपले प्राबल्य टिकवून आहे. या भागात मराठी मतांचे नेहमीच विभाजन दिसून येते. त्यामुळे पाचपैकी तीन वॉर्डात भाजप वरचढ आहे, तर दोन वॉर्डात मनसे आणि उद्धवसेनेची ताकद आहे. वॉर्ड क्रमांक १३३ मध्ये मनसेच्या माजी नगरसेवकाने शिंदेसेनेत प्रवेश केला असून, ही जागा तसेच वॉर्ड क्रमांक १३१ महाविकास आघाडीने कायम राखल्यास या भागात एकतर्फी विजयाचे भाजपचे स्वप्न अधुरे राहील. घाटकोपर पश्चिमेत मात्र भाजपसाठी अटीतटीची लढत आहे.
गड राखण्यासाठी प्रयत्न
राष्ट्रवादी (शरद पवार) च्या माजी नगरसेविका आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांना भाजपने उमेदवारी दिली असून, प्रभाग क्रमांक १३१ मध्ये त्यांचा सामना उद्धवसेनेच्या वृषाली चावक यांच्याविरुद्ध आहे. ही जागा कायम राखण्यासाठी महाविकास आघाडीला मेहनत घ्यावी लागेल. वार्ड क्रमांक १२९ मध्ये भाजपचे सूर्यकांत गवळी ६,२२७मते घेऊन जिंकले होते.
सर्वच उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती
प्रभाग १३० मधून भाजपचे माजी नगरसेवक आणि महापालिकेचे पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. मागील सभागृहात शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी भाजपने शिरसाठ यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. एवढेच नव्हे तर ते स्थायी समिती सदस्यही होते. स्वीकृत सदस्याला समितीवर घेता येते का? या विरोधात सत्ताधारी पक्ष न्यायालयातही गेला होता. परंतु, न्यायालयाने या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
प्रभाग १२५ मध्ये सतीश पवार (उद्धवसेना) व सुरेश आवळे (शिंदेसेना), प्रभाग १३३ मध्ये निर्मिती कानडे (शिंदेसेना) व भाग्यश्री कदम (मनसे), प्रभाग १२६ मध्ये अर्चना भालेराव (भाजप) व शिल्पा भोसले (उद्धवसेना), प्रभाग १२९ मध्ये अश्विनी मते (भाजप) व विजया गिते (मनसे) रिंगणात आहेत