नील सोमय्यांकडून मुलुंडमध्ये गडबड होणार याची शंका आलेली, दिनेश जाधवांनी अपक्ष अर्ज भरला; संजय राऊतही म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:42 IST2026-01-04T11:41:06+5:302026-01-04T11:42:52+5:30
Mulund Ward 107 Election : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात अपक्ष शड्डू ठोकलेले दिनेश जाधव यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

नील सोमय्यांकडून मुलुंडमध्ये गडबड होणार याची शंका आलेली, दिनेश जाधवांनी अपक्ष अर्ज भरला; संजय राऊतही म्हणाले...
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुलुंडचा प्रभाग क्रमांक १०७ सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. भाजपचे उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधात शड्डू ठोकणारे उमेदवार दिनेश जाधव यांनी सोमय्या यांच्यावर दमदाटीचे गंभीर आरोप केले आहेत. "नील सोमय्यांनी अनेकांना दमदाटी केली असेल, मात्र त्यांची मला धमकावण्याची हिंमत नाही," अशा शब्दांत जाधवांनी नील सोमय्या यांना आव्हान दिले आहे. तसेच नील सोमय्या काहीतरी गडबड करणार याची माहिती होती, म्हणूनच मी अपक्ष अर्ज भरला होता, असे जाधव यांनी म्हटले आहे. तर जाधव हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.
प्रभाग १०७ हा प्रामुख्याने मराठी भाषिक मतदारांचा प्रभाग आहे. दिनेश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "हा वॉर्ड मराठी भाषिकांचा असल्याने तो आम्हाला (ठाकरे गट) हवा होता, तसेच राष्ट्रवादीलाही हवा होता. मात्र, पुढे काहीतरी गडबड होईल, अशी शंका आम्हाला आधीपासूनच होती. म्हणूनच सावधगिरी म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता."
नील सोमय्यांवर 'दहशती'चा आरोप
दिनेश जाधव यांनी नील सोमय्या यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान दहशत निर्माण केल्याचा आरोप केला आहे. "सोमय्या यांनी आतापर्यंत अनेकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी अशा धमक्यांना भीक घालत नाही. या प्रभागातील जनता मराठी अस्मितेसाठी आणि हक्काच्या प्रतिनिधीसाठी मला साथ देईल," असा विश्वास जाधवांनी व्यक्त केला.
ठाकरेंचा छुपा पाठिंबा?
मुलुंडच्या या प्रभागातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्याने किंवा तांत्रिक कारणास्तव अर्ज बाद झाल्याने आता दिनेश जाधव हे नील सोमय्यांसमोर तगडे आव्हान मानले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जाधवांना अंतर्गत पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेनेचे उमेदवार आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.