झोपडपट्टी पुनर्विकास, २४ तास पाणी आणि स्वस्त बेस्ट प्रवास; वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:48 IST2026-01-09T09:48:49+5:302026-01-09T09:48:49+5:30
किमान ५०० चौ. फुटाचे घर, रखडलेले प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास, २४ तास पाणी आणि स्वस्त बेस्ट प्रवास; वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश समितीने गुरुवारी अखेर जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात झोपडपट्टी पुनर्विकास, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी, महिला आणि असंघटित कामगारांना डोळ्यासमोर ठेवून आश्वासने देण्यात आली आहेत.
एसआरए प्रकल्पात मिळणारी घरे मूलभूत हक्क असल्याचे नमूद करीत पात्र झोपडपट्ट्यांचा त्याच जागी पुनर्विकास, किमान ५०० चौ. फुटाचे घर, रखडलेले प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.
जाहीरनाम्यात नेमके काय?
संपूर्ण मुंबईत २४ तास अखंड पाणीपुरवठा, दरडोई किमान १३५ लिटर पाणी, पाणी दरात ३० टक्के कपात आणि मिठी नदीसह अन्य जलस्रोतांचे पुनरुज्जीवन.
बेस्ट बस सेवेच्या पुनरुज्जीवनासाठी उपनगरातील वीजपुरवठा अदानीकडून पुन्हा बेस्टकडे आणल्यामुळे बसभाडे कमी होईल आणि करारावरील चालकांना कायमस्वरूपी नोकऱ्या.
बंद पडलेल्या मराठी माध्यमांच्या शाळांचे पुनरुज्जीविन, शिक्षक भरती व प्रशिक्षण, पारलिंगी समुदायासाठी स्वतंत्र शाळा आणि ग्रंथालयांचे पुनरुज्जीवन.
पालिका रुग्णालयांतील रिक्त पदे भरणे, झोपडपट्ट्यांत आपला दवाखाना जाळेविस्तार आणि विशेष रुग्णालयांची उभारणी.