उद्धवसेनेच्या नाराजांसाठी शिंदेसेनेची फिल्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:47 IST2026-01-10T10:47:40+5:302026-01-10T10:47:47+5:30
ठाकरे बंधूंच्या युतीमधील जागावाटपात अनेकांना उमेदवारी मिळाली नाही. काही पदाधिकारी नाराज झाले असून, त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मैदानात उतरले आहेत.

उद्धवसेनेच्या नाराजांसाठी शिंदेसेनेची फिल्डिंग
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीमधील जागावाटपात अनेकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे काही पदाधिकारी नाराज झाले असून, त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मैदानात उतरले आहेत. मनसेचे शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांना पक्षात आणून शिंदे यांनी दक्षिण मुंबईत ठाकरे बंधूंना मोठे आव्हान दिले आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे विश्वासू पदाधिकारी नलावडे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. शिवडी, लालबाग, परळ या गिरणगाव पट्टयातील मराठी मतदारांना मनसेशी जोडून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश करीत पक्षाला धक्का दिला आहे. शिंदे यांनी प्रचारादरम्यान उद्धवसेनेचे माजी आ. दगडू सकपाळ यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. मुलगी रेश्मा हिच्यासाठी सकपाळ यांनी उद्धवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, येथे श्रद्धा पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज आहेत.
'सध्या तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही'
माजी आ. सकपाळ यांनी सध्या तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही. कुठे गेलो तरी 'मातोश्री'वर टीका करणार नाही. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, अशी खंत व्यक्त करत कुणाला गरज वाटली तर पुढे विचार करू, असा सूचक इशारा दिला आहे. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे आले होते. दुसरे काहीही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.