“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:27 IST2026-01-02T12:26:59+5:302026-01-02T12:27:39+5:30
Sanjay Raut On Mohan Bhagwat: मराठीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना आव्हान दिले आहे.

“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
Sanjay Raut On Mohan Bhagwat: महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना आता मराठी आणि अमराठी वाद पेटला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून सुमारे २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. यानंतर सुरुवातीला बेस्टची निवडणूक आणि आता मुंबई मनपा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला आहे. मुंबई मनपा निवडणुकीतही ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आहे.
मुंबई उपनगरासह लगतच्या परिसरात मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मराठी न बोलल्यामुळे परप्रांतीयांना मनसैनिकांनी चोप दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मराठी-अमराठीचा वाद मुंबई मनपा निवडणुकीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच मराठी बोलण्यावरूनही आव्हान दिले आहे.
मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?
देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक भाषेला समान महत्व आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, त्या ठिकाणची भाषा तुम्हाला आली पाहिजे, असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. याबाबत संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मग मोहन भागवतांना सांगा की, मराठीत बोला. त्यांना जास्त कधी मराठीतून बोलताना ऐकले आहे का, मराठीत बोलायला हवे. तुमचे नाव भागवत आहे ना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठी केला पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे जा, ते हिंदीत बोलतात.
दरम्यान, मुंबईमध्ये महापौर कोणाचा ही शंका असताच कामा नये. मुंबईत मराठीच महापौर होईल. पण आता भाजपाने सुरू केले आहे की, मुंबईचा महापौर हिंदू होईल. हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईतूनच हिंदुत्वाचा लढा सुरू केला हे लक्षात ठेवा . पण ही मुंबई मराठी आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.