“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:53 IST2025-12-29T11:52:03+5:302025-12-29T11:53:39+5:30
Sanjay Raut News: मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अदानींच्या माध्यमातून भाजपा करत आहे, त्याविरोधात आम्ही आमचा लढा कायम ठेवू, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
Sanjay Raut News: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या देशातील पहिल्या अत्याधुनिक महाविद्यालयाचे उद्घाटन बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले होते. शरद पवार म्हणाले की, गौतम अदानी यांचे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी लाखो लोकांना रोजगार दिला आहे. त्यांनी समाजहिताच्या अनेक गोष्टी उभ्या केल्या आहेत. त्यांचे कर्तृत्व नव्या पिढीसाठी सांगणे आवश्यक आहे. बारामतीतील कार्यक्रमाबाबत बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
गौतम अदानी यांनी शरद पवार यांना ‘माय मेंटॉर’ असे संबोधले. शरद पवारांना सर्व क्षेत्रातील माहिती अधिक आहे. शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आणि आदर्श आहेत. परिवर्तनाचे प्रतीक म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. एक नेतृत्व कसे विकास साधू शकते, याचे उदाहरण म्हणून शरद पवार यांच्या कामांना बघितले जाते, असे गौतम अदानी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना थेट प्रतिक्रिया दिली.
मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार
त्यात नवीन काय आहे. ज्यांनी शरद पवार यांचे आत्मचरित्र वाचले आहे, त्यात या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. शरद पवार यांनीच गौतम अदानी यांना एक तरुण उद्योजक म्हणून घडवले. एखाद्या नेत्याने तरुण उद्योजकाला घडवले असेल, जडण-घडण केली असेल, तेव्हा त्यांचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. परंतु, मुंबईसाठी गौतम अदानी आणि आमची नैतिक लढाई सुरूच राहील, तो संघर्ष रस्त्यावरही येऊ शकतो. आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. ज्या पद्धतीने मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अदानींच्या माध्यमातून भाजपा करत आहे, त्याविरोधात आम्ही आमचा लढा कायम ठेवू. या लढ्यात जे आमच्यासोबत येतील ते येतील. आलात तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्याशिवाय. मुंबईवर प्रेम असेल, ते येतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवार म्हणाले, गौतम अदानी यांनी १९८८ साली शून्यातून व्यवसायाची सुरुवात केली. आज त्यांच्या उद्योग समूहाचे २० देशांमध्ये कार्य सुरू आहे. ते तीन लाख लोकांना रोजगार देतात. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ३० वर्षांपासून पवार आणि अदानी कुटुंबाचे प्रेमाचे नाते आहे. माझ्यासाठी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीचे मोठ्या भावाचे आणि वहिनीचे नाते आहे. उद्याचा भारत कसा असेल, याचा विचार अदानींनी मांडला, त्या विचारांनी पुढे गेल्यास देशातील बेरोजगारी हटविण्यात यश मिळेल, अशी माझी खात्री आहे, असे शरद पवार म्हणाले.