Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘राजसाहेब तहात हरले, कुटुंबं एकत्र करण्यासाठी मनसेचा बळी दिला’, संतोष धुरींचा सनसनाटी दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:22 IST

Mumbai Municipal Corporation Election: आज भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीतीमध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी उद्धवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू असल्यापासून मनसेमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि पक्ष सोडण्याच्या कारणाबाबत अनेक सनसनाटी दावे केले आहेत.

ऐन मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना मनसेच्या मुंबईतील दुसऱ्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या संतोष धुरी यांनी आज भाजपात प्रवेश केला. संतोष धुरी यांच्या भाजपामधील प्रवेशामुळे मुंबईत मराठीबहूल असलेल्या काही प्रभागांमध्ये मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीतीमध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी उद्धवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू असल्यापासून मनसेमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि पक्ष सोडण्याच्या कारणाबाबत अनेक सनसनाटी दावे केले आहेत.

मनसे सोडण्यापासून ते भाजपात प्रवेश करण्यापर्यंतचा घटनाक्रम सांगताना संतोष धुरी म्हणाले की, २००७ साली पक्षाची स्थापना झाली तेव्हा आम्ही सर्वजण राज ठाकरेंसोबत बाहेर पडलो. आधी आम्ही शिवसेनेत होतो. मग मनसेत आलो. तिथेही आपलं काम सुरू ठेवलं. मनसेमध्ये मी शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, विविध पदे भूषवली. आम्ही एका झेंड्याखाली होतो. आमचं रक्त भगवं आहे. आधी शिवसेनेत होतो. त्यानंतर मनसेत आलो. मात्र आज जी युती सुरू झालेली आहे. हिरव्या लोकांशी जोडले गेलेले जे लोक आहेत त्यांना त्यांच्याच लोकांनी सोडून तुटून जाऊन नवा पक्ष स्थापन केला आहे. अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे मनसेचा ताबा घेतला आहे. साहेबांना पूर्ण मनसे पक्ष त्यांच्यासमोर सरेंडर केला आहे. मनसेला अशा जागा दिल्या आहेत, त्यात दिसायला आकडा ५२ आहे. मात्र त्या जागा पाहिल्या तर त्यातील ७-८ जागा तरी निवडून येतील का? याबाबत शंका आहे.  ज्या जागा आम्हाला हव्या होत्या, त्या आम्हाला दिल्या नाहीत. तसेच जिथे उद्धवसेनेकडे उमेदवार नव्हते, अशा जागा आम्हाला दिल्या. त्यांचे काही नगरसेवक होते तिकडे, पण त्यांचं नाव खराब होतं, अशा जागा आम्हाला लढायला दिल्या,  असा दावा संतोष धुरी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, माहिम, दादर, वरळी, शिवडी, भांडुप या ठिकाणी जिथे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे. जिथे आमची ताकद जास्त आहे, तिथे आम्ही दोन दोन जागांची मागणी केली होती. तिथे केवळ एकेका जागेवर आमची बोळवण करण्यात आली. तसेच उद्धवसेनेला वाटलं त्या जागा आम्हाला दिल्या. मागे मी प्रभाग क्रमांक १९४ मला दिला नाही म्हणून मी नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण हा विषयच नव्हता. ज्यावेळी मी आमच्या नेत्यांशी चर्चा केली. नेमकं घोडं कुठे अडतंय, असं विचारलं, तेव्हा त्यांनी प्रभाग क्रमांक १९२ आणि १९० बाबत तिढा असल्याचं सांगितलं. तसेचे १९४ प्रभाग मिळतोय, मात्र १९२ आणि १९० आपल्याला महत्त्वाचा आहे, असेही सांगण्यात आलं. तेव्हा मी १९२, घ्या १९० घ्या, काय करायचं ते करा, पण मला मोकळं करा, अशा भाषेत मी सरदेसाई साहेबांना सांगितलं. मात्र तेही झालं नाही. केवळ १९२ प्रभाग मिळाला. जिथे प्रकाश पाटणकर हे उद्धवसेनेचे नगरसेवक आधी निवडून आले होते. त्यांच्याकडून तो प्रभाग काढून मनसेला देण्यात आला. म्हणजे त्यांच्यावरही अन्याय झाला, असेही संतोष धुरी यावेळी म्हणाले.

धुरी पुढे म्हणाले की, पुढची महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे आम्हाला तर्चेत सहभागी करून घेतलं नाही. मला चर्चेत सहभागी करून घेतलं नाही हे ठीक आहे, पण आमचे नेते संदीप देशपांडे यांनाही चर्चेपासून दूर ठेवण्यात आले. त्यांना कुठेही सहभागी करून घेण्यात आलं नाही. त्याबाबत आम्ही विचारलं तेव्हा असं कळंल की,  वरून असा तह झाला आहे की, त्यात राजसाहेबांनी दोन किल्ले सरेंडर केले आहेत.  संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले साहेबांनी सरेंडर केले आहेत, अशी माहिती मिळाली. आम्ही दोघे कुठेही दिसता कामा नये, अगदी उमेदवार म्हणूनही दिसता कामा नयेत, असे वांद्रे येथील बंगल्यावरून सांगण्यात आलं. हे जेव्हा आम्हाला कळालं, तेव्हा आमची चर्चा झाली. असं होत असेल तर इथे राहण्यात काय अर्थ आहे, असे मी संदीप देशपांडे यांना म्हणालो.  काँग्रेससोबत जाऊन यांनी स्वत:चं रक्त हिरवं केलं आहे. आता हे आमच्यासोबत येऊन आमचंही रक्त हिरवं करणार, आपल्याला ते स्थान देणार नाहीत, त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीप देशपांडे यांचं मन मोठं आहे. ते म्हणाले की, तुझा तू विचार कर, त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो. त्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला, असे संतोष धुरी यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : MNS leader joins BJP, alleges Raj Thackeray surrendered to Sena.

Web Summary : MNS leader Santosh Dhuri joined BJP, claiming Raj Thackeray surrendered to Shiv Sena for family unity, sacrificing MNS interests. Dhuri alleged key leaders were sidelined during alliance talks, and important constituencies were conceded to Sena.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६मुंबई महानगरपालिकामनसेभाजपा