राज ठाकरे २० वर्षांनी सेना भवनात, मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून वचननामा प्रसिद्ध, दिली अशी आश्वासने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:25 IST2026-01-04T14:08:28+5:302026-01-04T14:25:34+5:30
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करून लढत असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला आहे.

राज ठाकरे २० वर्षांनी सेना भवनात, मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून वचननामा प्रसिद्ध, दिली अशी आश्वासने
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करून लढत असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला आहे. या निमित्ताने शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे हे सेना भनवामध्ये आले. तसेच ठाकरे बंधूंनी यावेळीमुंबईचा महापौर हा मराठीच होणार, या आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला.
मुंबईकरांसाठीचा शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध केल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडली त्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते महाराष्ट्राला यापूर्वी लाभले नव्हते. बिनविरोध निवडणूक करण्याची जी काही प्रक्रिया ते राबवत आहेत, हा जनतेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच काही झालं तरी मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होणार असे त्यांनी ठणकावून सांगितले.
तर संयुक्त वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर वचननाम्यातील आश्वासने ही मराठी माणासाठीच आहेत, असेही राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे सभांमधून अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तसेच आज वचननामा जाहीर करायचा होता. तेवढ्यापुरता तो विषय ठेवा. बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सभांंमधून मिळतील, असे सूचक विधानही राज ठाकरे यांनी केले.
दरम्यान, आज प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यामधून ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठी आवास, सार्वजनिक आरोग्य, रोजगार, शिक्षण, परिवहन अशा विविध बाबींशी संबंधित महत्त्वपूर्ण आश्वासनं दिली आहे. त्यातील प्रमुख आश्वासने खालील प्रमाणे आहेत
-पुढच्या ५ वर्षांत मुंबईकरांना एक लाख स्वस्त घरं बांधणे
-५ वैद्यकीय महाविद्यालये उभारणे
-घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत महिलांना दरमहा १५०० रुपये देणे
-१ लाख तरुणांना २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगारासाठी सहाय्य
-सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये बोलतो मराठी अभियान राबवणार
-प्रदूषणमुक्त मुंबईसाठी योजना राबवणे
-७०० फुटांपर्यंतच्या घरांसाठी कर माफी
-१०० युनिटपर्यंत मोफत वीज
-महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग सुविध
- बेस्टची भाडेवाढ रद्द करून किफायतशीर बेस्ट प्रवास
अशी विविध आश्वासने ठाकरे बंधूंनी वचननाम्यामधून दिली आहे.