चोख व्यवस्था! १४८ भरारी पथकांचे जाळे सज्ज
By सीमा महांगडे | Updated: January 7, 2026 11:49 IST2026-01-07T11:49:51+5:302026-01-07T11:49:51+5:30
मुंबईत १४८ भरारी आणि १८१ स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.

चोख व्यवस्था! १४८ भरारी पथकांचे जाळे सज्ज
सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था चोख राहावी यासाठी निवडणूक आयोग स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शहरात अनेक खबरदारीचे उपाय राबवत असतो. महापालिकेने मुंबई शहरात भरारी आणि स्थिर पथकांचे जाळे निर्माण केले आहे. मुंबईत १४८ भरारी आणि १८१ स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.
मुंबईतील २२७प्रभागांत १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळे भरारी पथकांच्या तपासणीचा वेगही वाढला आहे. स्थिर सर्वेक्षण पथकांना कसून तपासणी करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेसाठी १४८, तर १८१ स्थिर सर्वेक्षण केंद्रे तैनात केली आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंच्या बेकायदा व्यवहारांवर केंद्र, राज्य सरकार आणि अन्य प्राधिकरणांमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी मुंबईत आणि उपनगरांत भरारी पथके तैनात केली आहेत. याशिवाय स्थिर पथके, व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी एक पथक आणि चित्रीकरण तपासण्यासाठी स्वतंत्र पथक अशी उपाययोजना करण्यात आली आहे.
मुंबईत १ कोटी मतदारांसाठी १० हजार २३१ मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. ही १४८ भरारी पथके कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणार आहेत. या पथकांतील कर्मचारी टप्प्याटप्प्याने काम करीत असल्याची माहिती मुंबई शहराचे निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
असे चालते काम...
मुंबई शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय भरारी आणि स्थिर पथके तैनात केली आहेत. भरारी पथकांकडून मिळालेल्या सूचनेनुसार मतदारसंघात विविध ठिकाणी भेट दिली जाते किंवा तक्रार आल्यानंतर त्याठिकाणी शोधमोहीम राबवली जाते. दुसरीकडे स्थिर पथके संबंधित मतदारसंघातील महत्त्वाच्या ठिकाणी कक्ष उभारून तपासणी करतात. ही तपासणी करताना चित्रीकरण केले जाते. त्यानंतर सनियंत्रण समिती ते तपासते.
भरारी पथकाची प्रमुख कामे
आचारसंहिता अंमलबजावणी : निवडणूक आचारसंहितेचे पालन होते की नाही, याची खात्री करणे.
पैसा आणि दारू नियंत्रण : उमेदवारांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून होणारे पैशांचे वाटप, दारू किंवा इतर वस्तूंचे वाटप यावर लक्ष ठेवणे आणि ते थांबवणे.
संशयास्पद हालचालींवर लक्ष: शांततेत व्यत्यय आणणाऱ्या कोणत्याही हालचाली किंवा घटनांची त्वरित दखल घेणे.
नियमबाह्य प्रचार रोखणे : निवडणूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रचारसभा किंवा घोषणांवर नियंत्रण ठेवणे.
तक्रारींची दखल : नागरिकांकडून किंवा राजकीय पक्षांकडून आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल आलेल्या तक्रारींची चौकशी करणे.
व्हिडीओग्राफी आणि देखरेख : संशयास्पद ठिकाणी व्हिडीओग्राफी करणे आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणे.