होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप; राहुल शेवाळे यांची आदित्य, अमित ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:23 IST2026-01-04T13:20:49+5:302026-01-04T13:23:14+5:30
उद्धवसेना भवन येथे शुक्रवारी आदित्य व अमित यांनी महापालिका करणाऱ्या योजनांची माहिती दिली होती.

होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप; राहुल शेवाळे यांची आदित्य, अमित ठाकरेंवर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या अधिनियमात न बसणाऱ्या गोष्टींचे आदित्य व अमित ठाकरे यांनी सादरीकरण केले आहे. यामुळे त्यांचे अर्धवट ज्ञान व अपूर्ण गृहपाठ असल्याचे दिसून आल्याची टीका शिंदेसेनेचे नेते व सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी शनिवारी केली. त्यांच्या पालकांनी युवराजांना थोडे समजावून व अभ्यास करून वर्कशॉपसाठी पाठवायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्धवसेना भवन येथे शुक्रवारी आदित्य व अमित यांनी महापालिका करणाऱ्या योजनांची माहिती दिली होती. त्यावरून शेवाळे यांनी हे वर्कशॉप म्हणजे कंपनीच्या संचालकांसाठी केलेले प्रेझेंटेशन होते. यातील काही गोष्टी या केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील असून, २० आमदार व ८ खासदारांच्या जोरावर ही कामे करता येणार नाहीत. त्यामुळे उद्धवसेना कोणतीही कामे करू शकत नाहीत, अशी टीका केली.
उद्धवसेना भवन येथे शुक्रवारी आदित्य व अमित यांनी महापालिके द्वारे होणाऱ्या योजनांची माहिती दिली होती.
'या' मुद्द्यांकडे वेधले लक्ष
मुंबईकरांच्या घरांबाबत दिलेले आश्वासन, ७०० चौ. फूट मालमत्तेवरील कर माफ, १०० युनिट वीज मोफत, नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणे, पालिका शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणे अशा केलेल्या घोषणांना नगरविकास विभाग, राज्य वीज नियामक आयोग, नॅशनल मेडिकल कमिशन, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मान्यता आवश्यक आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना आत्मसन्मान देण्याची त्यांनी घोषणा केली असली तरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेला त्यांनीच विरोध केला होता, याकडेही शेवाळे यांनी लक्ष वेधले.