११ प्रभागांत 'वन टू वन' लढत; विधानसभा अध्यक्षांचे बंधू, माजी महापौरही पुन्हा आखाड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:23 IST2026-01-07T12:23:35+5:302026-01-07T12:23:35+5:30
मुंबई महापालिकेतील एकूण २२७ पैकी ११ प्रभागांत दोन उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्यात 'वन टू वन' लढत होणार आहे.

११ प्रभागांत 'वन टू वन' लढत; विधानसभा अध्यक्षांचे बंधू, माजी महापौरही पुन्हा आखाड्यात
सुजित महामुलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेतील एकूण २२७ पैकी ११ प्रभागांत दोन उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्यात 'वन टू वन' लढत होणार आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, उद्धवसेनेच्या माजी महापौर व माजी आ. विशाखा राऊत आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची भावजय वंदना गवळी या तीन प्रभागांत रिंगणात असून, तेथील निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर असलेल्या प्रभागात विशाखा राऊत यांच्याविरुद्ध माजी आ. सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव शिंदेसेनेकडून निवडणूक रिंगणात आहे. तर, दक्षिण मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू भाजपचे मकरंद नार्वेकर आणि अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. यामध्ये राहुल नार्वेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. तिसऱ्या लढतीकडे अंडरवर्ल्डचेही लक्ष लागले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची भावजय वंदना गवळी शिंदेसेनेकडून, तर अबोली खाड्ये या उद्धवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
तीन ठिकाणी शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना
एकास एक उमेदवार असलेल्या या ११ लढतींमध्ये शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना तीन ठिकाणी टक्कर देणार आहे. दोन प्रभागांत शिंदेसेना विरुद्ध मनसे, चार प्रभागांत भाजप विरुद्ध उद्धवसेना आणि एक प्रभागात भाजपविरुद्ध मनसे, तर एका ठिकाणी भाजपविरुद्ध अपक्ष सामना रंगणार आहे. यातील आठ प्रभाग हे ओबीसी महिला आणि दोन प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून, एक प्रभाग सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे.
एकास एक उमेदवार असलेल्या लढती अशा...
| प्रभाग क्रमांक | उमेदवार आणि पक्ष (युती/महायुती) | विरुद्ध | उमेदवार आणि पक्ष (विरोधी/इतर) |
| ६ | दीक्षा कारकर (शिंदेसेना) | X | संजना वेंगुर्लेकर (उद्धवसेना) |
| ११ | अदिती खुरसंगे (शिंदेसेना) | X | कविता माने (मनसे) |
| १३ | राणी द्विवेदी (भाजप) | X | आसावरी पाटील (उद्धवसेना) |
| १५ | जिग्नासा शाह (भाजप) | X | जयश्री बंगेरा (उद्धवसेना) |
| १८ | संध्या दोषी (शिंदेसेना) | X | सदिच्छा मोरे (मनसे) |
| १९ | दक्षता कवठणकर (भाजप) | X | लीना गुढेकर (उद्धवसेना) |
| ४६ | योगीता कोळी (भाजप) | X | स्नेहीता डेहलीकर (मनसे) |
| १३२ | रितू तावडे (भाजप) | X | क्रांती मोहिते (उद्धवसेना) |
| १९१ | प्रिया सरवणकर-गुरव (शिंदेसेना) | X | विशाखा राऊत (उद्धवसेना) |
| १९८ | वंदना गवळी (शिंदेसेना) | X | अबोली खाड्ये (उद्धवसेना) |
| २२६ | मकरंद नार्वेकर (भाजप) | X | तेजल दीपक पवार (अपक्ष) |