ठाकरेंसोबत होते आणि सोबतच राहणार: 'नॉट रिचेबल' नगरसेविका सरिता म्हस्के 'मातोश्री'वर हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 06:46 IST2026-01-23T06:45:28+5:302026-01-23T06:46:17+5:30
एका बड्या नेत्याकडून अपहरणाचा प्रयत् झाल्याचा दावा

ठाकरेंसोबत होते आणि सोबतच राहणार: 'नॉट रिचेबल' नगरसेविका सरिता म्हस्के 'मातोश्री'वर हजर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीला तसेच कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या गैरहजर होत्या. मात्र, देवदर्शनासाठी बाहेर गेल्याने नॉट रिचेबल होते. तिथून येण्यास उशीर झाल्यामुळे गट नोंदणीसाठी पोहोचले नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोबत होते. यापुढेही राहणार आहे, असे डॉ. म्हस्के यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
डॉ. म्हस्के या नॉट रिचेबल झाल्याने त्यांच्याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र, देवदर्शनावरून मुंबईत परत आल्यावर त्यांनी रात्री उशिरा उद्धवसेनेचे आ. मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सकाळी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी घटनाक्रम सांगितला. निकालानंतर ५ दिवसांत तुळजापुर येथे दर्शनाला येण्याचा नवस बोलले होते. तो फेडण्यासाठी गेल्याने नॉट रिचेबल होते. या दरम्यान विरोधकांनी बदनामी करण्याच्या हेतूने पक्ष बदलाच्या अफवा पसरविल्या, असे त्या म्हणाल्या.
एका बड्या नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न
शिंदेसेनेच्या संपर्कात नव्हते. परंतु, त्यांच्या एका बड्या नेत्याने अपहरणाचा प्रयत्न केला. त्यांना हुलकावणी देत तुळजापूरला नवस फेडण्यासाठी गेले. तिथे मोबाईलला रेंज नसल्याने मुंबईत काय चालू होते याची कल्पना नव्हती. मात्र, रेंज मिळल्यानंतर या गोंधळाची माहिती मिळाली. आ. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी पोचले, असे डॉ. सरिता म्हस्के यांनी सांगितले.