Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 06:49 IST

घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या आघाडीने वचननाम्यात दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईकरांसाठी १० रुपयांत नाष्टा आणि दुपारचे जेवण देणारी ‘माँसाहेब किचन्स’ आणि घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या आघाडीने वचननाम्यात दिले आहे. निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेण्यात येऊ नये म्हणून ‘मराठी माणसां’साठी असा स्पष्ट उल्लेख वचननाम्यात टाळण्यात आला असून ‘मुंबईकर’ म्हणजे ‘मराठी माणूसच’ आम्हाला सांगायचे असल्याचे स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले.

मुंबई महापालिकेचे स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण, पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी घरे, पाळणाघरे सुरू करणार, प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट क्रॅश, पेट ॲम्ब्युलन्स, पेट क्रेमॅटोरिअमची सोय, १ लाख तरुण-तरुणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपये स्वयंरोजगार साहाय्यता निधी, मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुण-तरुणींसाठी वसतिगृह, प्रत्येक वॉर्डात एक आजी-आजोबा उद्यान, ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ आदींचा वचननाम्यात समावेश आहे. विद्यार्थी संख्येची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणारण्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. 

नद्या स्वच्छतेवर भर

मिठी, ओशिवरा, पोयासार, दहिसर नद्या आणि माहुल खाडीची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करून पर्जन्यज व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, बीपीटीच्या १,८०० एकर जमिनीवर उद्योजकता आणि वित्तीय केंद्र उभारणे, गुजरातला नेलेले आर्थिक-वित्तीय केंद्र मुंबईत पुनःस्थापित करणे, ऑलिम्पिक दर्जाची स्पोर्टस सिटी उभारण्यासह महापालिका कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व आजारांसाठी १० लाखांचा मेडिक्लेम, वाहतूक कोंडीचे २०० स्पॉट्स शोधून प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांसाठी काय? 

- पाण्याचे दर स्थिर ठेवणार

- पुढील १० वर्षांत कांजूरमार्ग कचराभूमी बंद करून प्रभाग पातळीवर कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार

-  उत्तम रस्ते बनवणार, कंत्राटदाराच्या चुकीमुळे खड्डे पडल्यास जबर दंड वसूल करणार.

- नालेसफाईचे काम १२ महिने करणार

-  'पादचारी प्रथम' धोरणाची अंमलबजावणी करणार

-  महिला, विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास

-  १०,००० इलेक्ट्रिक बस ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बस आणणार

- घरगुती ग्राहकांना १०० युनिटपर्यंत बेस्टची वीज मोफत 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: ₹10 Meals Promised in Manifesto for Municipal Elections

Web Summary : Thackeray's alliance promises ₹10 meals, financial aid for women, affordable housing, pet-friendly facilities, youth employment support, and infrastructure improvements. Focus on river cleanup, BPT land development, and free BEST bus travel for women and students are also key.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६उद्धव ठाकरेराज ठाकरेशिवसेनामनसे