पाणी दरात २० टक्के कपातीचे काँग्रेसचे आश्वासन; जाहीरनाम्यात हक्काचे घर, बेस्ट सक्षमीकरणास प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:26 IST2026-01-07T09:26:03+5:302026-01-07T09:26:03+5:30
मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

पाणी दरात २० टक्के कपातीचे काँग्रेसचे आश्वासन; जाहीरनाम्यात हक्काचे घर, बेस्ट सक्षमीकरणास प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई काँग्रेसने ‘मिशन २०२६, विवाद नको , विकास हवा’ टॅग लाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात पाणी दरात २० टक्के कपात, ५ टक्के निधी अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव, दरवर्षीची आठ टक्के पाणी दरवाढ रद्द, मुंबईकरांना आरोग्य कार्ड, बेस्टचे सक्षमीकरण आणि मुंबईकरांना हक्काचे घर देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
शहरातील विद्यमान पार्किंगचे ऑडिट करण्याबरोबरच नवीन पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. त्याचबरोबर फेरीवाला कायदा २०१४ ची अंमलबजावणी आणि पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन, खड्डेमुक्त शहर, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई, रस्ते कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासनेही काँग्रेसने दिले.
जलसुरक्षा : पाणी पुरवठा ५००० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवणार, तलावातील गाळ काढून साठवण क्षमतेच वाढ करणार
आरोग्य सुरक्षा : रुग्णालयांचे खासगीकरण नाही, मोफत युनिव्हर्सल हेल्थ कार्ड, दोन नवीन मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालये
शिक्षण सुरक्षा : पालिकेच्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करणा, विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा
स्वच्छ मुंबई : मुंबई कचरामुक्त आणि धूळमुक्त करणार, सोसायट्यांमधील कचरा मोफत उचलणार
प्रदूषणमुक्त मुंबई : बांधकामातून होणाऱ्या - प्रदूषणावर नियंत्रण ,हरितक्षेत्राचा विकास ‘’ ग्रीन मुंबई २०३०’’
प्रकाशमान मुंबई : डिजिटल आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेली फसवणूक थांबवणार, नागरिकांचे वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न, अदानीकडे गेलेल्या बेस्टच्या वीज हस्तांतरणाची चौकशी , उपनगरातील वीजपुरवठा पुन्हा बेस्टकडे
अग्निशमन सेवा : आधुनिक अग्निशमन वाहने , भरती प्रक्रिया करणार, दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये मिनी फायर स्टेशन , उंच इमारतींसाठी दरवर्षी अग्निसुरक्षा ऑडिट सक्तीचे
बेस्ट : बसची संख्या ६,००० पर्यंत वाढवणार, बेस्टचे खाजगीकरण नाही, सेवा परवडणारी.
स्मशानभूमी : लोकसंख्येच्या गरजेनुसार नवीन सुविधा , देखभाल , आधुनिक विद्युतदाहिनी प्रणाली
हक्काचे घर : क्लस्टर पुनर्विकासासाठी ३००० चौ.मी. पर्याय, कोळीवाडा व गावठाणांसाठी विशेष विकास धोरण , मराठी कुटुंबांना घर
महिला सक्षमीकरण : अधिक अंगणवाड्या , वॉर्डमध्ये “हिरकणी कक्ष” , काम करणाऱ्या महिलांसाठी डे-केअर केंद्रे , , सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन्स
सार्वजनिक वाहतूक : नागरी सेवांचा अधिक जलद व प्रभावी पुरवठा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व एआय
बाजारपेठा : परळ ते लोअर परळ-माटुंगा पट्ट्यात दुसरे ‘बीकेसी’ , नवीन- आधुनिक बाजारपेठा
‘वंचित’चा आज जाहीरनामा
काँग्रेस वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षांचा संयुक्त जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध करत आहोत, असे काँग्रेसने सांगितले खरे; मात्र पूर्वकल्पना न देता रासप आणि आरपीआयला (गवई गट) या युतीत घेतल्याने नाराज ‘वंचित’ने जाहीरनाम्यात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे ‘वंचित’कडून उद्या स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.