Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०२८-२९ पर्यंत विस्तारित मुंबईत एका ठिकाणाहून दुसरीकडे केवळ ५९ मिनिटांत: CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 05:40 IST

मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, महायुतीचाच असेल आणि तो हिंदूच असेल हे त्यांच्या छाताडावर उभे राहून सांगतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:  लोकलमध्ये धक्के खात फिरणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी साडेचारशे किमीचे मेट्रो नेटवर्क आम्ही पूर्ण करणार आहोत. २०२८-२९ पर्यंत मुंबईच नाही तर विस्तारित मुंबईत एका ठिकाणहून दुसरीकडे केवळ ५९ मिनिटांत जाता येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी  दिली.

भाजप-शिंदेसेनेच्या वतीने वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित प्रचार प्रारंभाच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, महायुतीचाच असेल आणि तो हिंदूच असेल हे त्यांच्या छाताडावर उभे राहून सांगतो, असे फडणवीस म्हणाले. 

पब्लिक है सब जानती है. कोस्टल रोड, बीडीडीचा विकास, मेट्रो कोणी केले कोणीही सांगेल. प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली हे विचारा ते एकच नाव घेतील ते म्हणजे उद्धव ठाकरे. इतकी वर्षे आपण बोलबच्चन बघितले. आता मुंबईकरांचे जीवन बदलून टाकणारी महायुती आली आहे. आता दानापानीवाल्यांना त्यांचा ठिकाणा दाखवायचा आहे. निवडणूक आली की, मुंबई यांना उत्तरेकडे सरकताना दिसते, त्यांची बुद्धी सरकते, पण मुंबई तिथेच असते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मुंबईला जितके मिळाले तितके आज जे आव आणून बोलतात त्यांच्या काळात मिळाले नाही, असेही फडणवीस म्हणाले.

७० हजारांच्या फिक्स डिपॉझिटच्या रिसिट काय चाटायच्या आहेत. हद्दपार होणाऱ्या गिरणी कामगाराला त्या दोन-चार हजार कोटींत मुंबईत घर मिळाले असते. मराठी माणसाला त्याचे हक्काचे घर द्यायचे आहे. बीडीडी चाळीचा अनेक वर्षांचा संघर्ष चालला होता. निर्धार केला बीडीडी चाळी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. ८० हजार मराठी माणसे हद्दपार होणार होती, असे ते म्हणाले.

मुंबई सदैव मराठी माणसाचीच : शिंदे

मुंबईचा महापौर मराठीच होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली.  “निवडणुका आल्या की ते कायम मुंबई तोडणार अशी आवई उठवितात,” अशी टीका उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख टाळून शिंदेंनी केली. मुंबई मराठी माणसांचीच होती, सदैव मराठी माणसांचीच राहील, ही मुंबई गिरणी कामगार, डबेवाले, चाकरमान्यांची आहे. कोणी माईका लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईचा रंग बदलण्याच्या कटाचे उद्धव ठाकरे भागीदार : साटम

संपलेले राजकारण पुन्हा सुरू करण्यास उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरवी चादर ओढून घेतली आहे. जगभरात काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलला आहे. तेच कट कारस्थान मुंबईतही होत असून, उद्धव त्यात भागीदार आहेत, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आ.अमित साटम यांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Travel across extended city in 59 minutes by 2029.

Web Summary : CM Fadnavis promises a 450 km metro network, enabling 59-minute commutes across extended Mumbai by 2029. He asserted a Mahayuti Marathi Hindu mayor will lead. He criticized Thackeray's stalled projects, highlighting Mahayuti's development plans and commitment to Marathi housing.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६देवेंद्र फडणवीसभाजपामहायुती