डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 06:14 IST2026-01-08T06:13:23+5:302026-01-08T06:14:50+5:30
अरुण गवळी याच्या दोन्ही मुली, गीता आणि योगिता या महापालिका निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या दोन्ही मुली, गीता आणि योगिता या महापालिका निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दोघी बहिणी कोट्यधीश असल्याचे स्पष्ट होत आहे.
अखिल भारतीय सेना पक्षातर्फे गीता गवळी (४२) यांनी २१२ प्रभागातून तर त्यांची लहान बहीण योगिता (३७) यांनी प्रभाग २०७ मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन्ही प्रभाग हे भायखळा विभागात आहेत.
गीता यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ७.२६ कोटी रुपये जाहीर करण्यात आली आहे. यात गीता यांच्या स्वतःच्या मालकीचे १,००० ग्रॅम सोने-चांदीचे दागिने असून, त्यांच्या पतीकडे ५०० ग्रॅमचे दागिने आहेत. तसेच गीता यांच्या नावावर ३० लाखांची मर्सिडिस बेंझ (२०२३) असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये गीता यांनी विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ३.३८ कोटी जाहीर केली होती. यावरून गेल्या सहा वर्षांत त्यांची संपत्ती दुपटीने वाढल्याचे स्पष्ट होते.
गीता यांचे शिक्षण एसएससीपर्यंत झाले असले तरी तर योगिता यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे. योगिता यांनी जंगम आणि स्थावर मालमत्ता ३.६५ कोटी रुपये जाहीर केली आहे. त्यात ७५० ग्रॅम दागिने आणि त्यांच्या पतीच्या नावावर एक बीएमडब्लू कार आणि २५० ग्रॅम दागिने असल्याचे नमूद आहे.
खासदार कुटुंबियांकडे ना बंगला, ना गाडी
उद्धवसेनेचे खासदार संजय पाटील यांची कन्या राजुल यांच्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न ३.९३ लाख रुपये आहे. तर एकूण मालमत्ता ६८ लाख ५५ हजार ३८५ असल्याचे नमूद आहे. स्थावर मालमत्ता काहीही नसल्याचे म्हटले आहे. पाटील कुटुंबाकडे स्वतःचे घर व वाहन नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मकरंद नार्वेकर यांची मालमत्ता १२.४४ लाखांची
दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे तीन नातेवाईक वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात आहेत. त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे प्रभाग २२६ मधून रिंगणात आहेत. त्यांची मालमत्ता १२.४४ लाख आहे.
नार्वेकर यांच्या वाहिनी हर्षिता (प्रभाग २२५) यांची मालमत्ता ६.३६ लाख आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६,२०५ रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. हर्षिता या एमबीए व एमएस झालेल्या आहेत. नार्वेकर यांच्या भगिनी डॉ. गौरवी शिवलकर (प्रभाग २२७) यांची संपत्ती १.३६ कोटी रुपये आहे.
४६ कोटींची मालमत्ता
शिंदेसेनेचे माजी आ. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर (प्रभाग १९४) यांची संपत्ती ४६ कोटी ५९ लाख आहे. समाधान यांची बहीण प्रिया सरवणकर (प्रभाग १९१) यांची संपत्ती १२.१६ कोटी आहे. पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व भाजप उमेदवार रवी राजा (प्रभाग १८५) यांची संपत्ती १०.१२ कोटी आहे.
माजी मंत्री नवाब मलिक यांच्या भगिनी आणि १६८च्या उमेदवार डॉ. सईदा खान भूलतज्ज्ञ असून त्यांची मालमत्ता १३ कोटी ११ लाख इतकी आहे. तर त्यांचे बंधू कप्तान मलिक १६५ प्रभागातून उभे आहेत. ते दहावी पास असून त्यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ४४ लाख रुपयांची आहे. प्रभाग क्रमांक १७० मधून कप्तान मलिकांच्या सून बुशरा मलिक रिंगणात आहेत. त्यांच्याकडे सुमारे २ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
शिंदेसेनेचे आ. दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला प्रभाग १६३ मधून रिंगणात असून त्यांची मालमत्ता ८ कोटी १८ लाख इतकी आहे. त्यांचे जनरल स्टोअर्स आहे. तर १६९ प्रभागातून शिंदेसेनेचे आ. मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय रिंगणात आहेत. त्यांची मालमत्ता २ कोटी ५४ लाख आहे.