BMC Election Results 2026: भाजपला धारावीत धोबीपछाड; रवी राजांचा पराभव, ठाकरेंच्या शिवसैनिकाने मारली बाजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:27 IST2026-01-16T15:25:18+5:302026-01-16T15:27:22+5:30
BMC Mumbai Municipal Election Results 2026: काँग्रेसची ४४ वर्षांची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या रवी राजा यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

BMC Election Results 2026: भाजपला धारावीत धोबीपछाड; रवी राजांचा पराभव, ठाकरेंच्या शिवसैनिकाने मारली बाजी!
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी आज अनेक दिग्गजांना जमीनदोस्त केले आहे. यात सर्वात मोठे नाव म्हणजे भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा. काँग्रेसची ४४ वर्षांची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या रवी राजा यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. धारावीतील प्रभाग क्रमांक १८५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार टी. एम. जगदीश यांनी रवी राजांचा पराभव करत विजय मिळवला आहे.
मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live
काँग्रेस सोडली, पण नशीब नाही बदलले
रवी राजा हे मुंबई काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते होते. सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या राजा यांची कुर्ला-धारावी पट्ट्यात मोठी पकड मानली जात होती. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना मुंबईचे उपाध्यक्ष पद देऊन सन्मान केला आणि प्रभाग १८५ मधून उमेदवारी दिली. मात्र, मतदारांनी त्यांच्या या पक्षांतराला पसंती दिली नसल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
धारावीत ठाकरेंच्या शिवसेनेचा करिश्मा
प्रभाग १८५ मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे टी. एम. जगदीश, भाजपचे रवी राजा आणि काँग्रेसचे कमलेश चित्रोडा यांच्यात सामना होता. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी होता. रहिवाशांमध्ये असलेल्या असंतोषाचा फायदा ठाकरे गटाला मिळाला असून, टी. एम. जगदीश यांनी रवी राजांसारख्या अनुभवी नेत्याला पराभवाची धूळ चारली आहे.
अनुभव विरुद्ध निष्ठा
रवी राजा यांनी प्रचारादरम्यान आपल्या २५ वर्षांच्या अनुभवाचा दाखला दिला होता. मात्र, ठाकरे गटाने 'गद्दारी विरुद्ध निष्ठा' हा मुद्दा लावून धरला होता. रवी राजांचा पराभव हा केवळ त्यांचा वैयक्तिक पराभव नसून, मुंबई भाजपसाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्या अनुभवाच्या जोरावर भाजपने त्यांना पक्षात घेतले होते, तो अनुभव मतदानामध्ये परावर्तित करण्यात राजा अपयशी ठरले आहेत.