"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:14 IST2026-01-05T10:30:15+5:302026-01-05T11:14:21+5:30
भाजपची घरफोडी वृत्ती ठेचायला आलोय म्हणत उद्धव ठाकरे यांनी विनोद घोसाळकरांचे कौतुक केले.

"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"
Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सकाळी शिवसेना भवनातून शिवशक्ती वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम उपनगरातील पक्षाच्या शाखांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दहिसरच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर आणि ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांच्यात लढत होत आहे. कोलगेंच्या प्रचार कार्यालयाला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिवंगत अभिषेक घोसाळकरांच्या आठवणींना उजाळा देत भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर कडाडून प्रहार केला.
'अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती'
दहिसरचा हा वॉर्ड सध्या मुंबईत सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपची वाट धरल्याने घोसाळकर कुटुंबात राजकीय फूट पडली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप घरफोडी करत असल्याचा आरोप करत अभिषेक घोसाळकरांची आठवण काढली. "आज मला अभिषेकची खूप आठवण येतेय कारण अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती. हे प्रकरण झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते आणि आपण त्यांचा राजीनामा मागितला होता. पण त्यावर जी प्रतिक्रिया दिली होती त्याचा मी आता उच्चारही करु शकत नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.," असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या घरफोडी वृत्तीचा आपल्याला पराभव करावाच लागेल. उद्या ते तुमची घरं फोडल्याशिवाय राहणार नाहीत. याचा अनुभव आम्हीसुद्धा घेतलाय, असेही ठाकरे म्हणाले.
विनोद घोसाळकरांच्या निष्ठेचे कौतुक
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कट्टर शिवसैनिक विनोद घोसाळकर उपस्थित होते. आपल्याच सुनेच्या विरोधात पक्षाचा प्रचार करण्याच्या घोसाळकरांच्या निर्णयाचे ठाकरेंनी जाहीर कौतुक केले. "मला विनोद घोसाळकरांचा सार्थ अभिमान आहे. ते शिवसेनाप्रमुखांचे कट्टर शिवसैनिक आहेत. ज्या वृत्तीने त्यांचं घर फोडलं, ज्यांनी घराघरात भांडणं लावली, त्या प्रवृत्तीचा पराभव करण्यासाठी मी इथे आलो आहे," अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या रणनीतीवर हल्ला चढवला.
"मी तेजस्वीच्या विरोधात नाही, तर..."
आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले की, ही लढाई वैयक्तिक नसून वैचारिक आहे. "माझं कोणाशी व्यक्तिगत भांडण नाही, उलट मी त्यांना जो वॉर्ड दिला होता त्यांच्या प्रचारासाठी आलो होतो. पण भाजपची ही कूटनीती आहे की, भांडणे लावा आणि घरं फोडा. त्यामुळे मतदारांनी भावनेत अडकू नये, तर धनश्री कोलगे यांना विजयी करून निष्ठेला साथ द्यावी," असे आवाहन त्यांनी दहिसरकरांना केले.
घोसाळकरांच्या बालेकिल्ल्यात अस्तित्वाची लढाई
दहिसरचा प्रभाग २ हा वर्षानुवर्षे घोसाळकर आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. इथे विनोद घोसाळकरांचा मोठा प्रभाव आहे. भाजपने मुद्दाम त्यांच्याच सुनेला उमेदवारी देऊन हा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे, प्रभाग ७ मधून विनोद घोसाळकरांचे सुपुत्र सौरभ घोसाळकर रिंगणात आहेत. त्यामुळे आपल्या या विश्वासू शिलेदारांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज दहिसरच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.