'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:40 IST2026-01-01T11:20:21+5:302026-01-01T11:40:59+5:30
सायनच्या प्रतिक्षानगरमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराने एबी फॉर्मची झेरॉक्स काढून निवडणूक अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला.

'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सायनमधील प्रतीक्षा नगर येथील प्रभाग क्र. १७३ मध्ये एका धक्कादायक प्रकाराची चर्चा रंगली आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवाराने मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेला अधिकृत एबी फॉर्म परत केला, मात्र त्याची कलर झेरॉक्स काढून निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बंडखोरीमुळे या प्रभागात महायुतीच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून याचा फायदा थेट ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे.
नक्की प्रकरण काय?
प्रतीक्षा नगर प्रभाग क्रमांक १७३ मध्ये भाजपने सुरुवातीला दत्ता केळुस्कर यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला होता. मात्र, महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार हा प्रभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सुटला. शिंदे गटाने येथून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे दत्ता केळुस्कर आणि त्यांच्या पत्नी शिल्पा केळुस्कर यांनी बंडाचा पवित्रा घेतला.
पक्षाची फसवणूक आणि 'कलर झेरॉक्स'
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महायुतीचा धर्म पाळत केळुस्कर यांना दिलेला एबी फॉर्म परत मागितला. केळुस्करांनी वरकरणी खरा फॉर्म साटम यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, त्याआधीच त्यांनी त्या फॉर्मची कलर झेरॉक्स काढून घेतली होती. ३० तारखेला अर्ज भरताना शिल्पा केळुस्कर यांनी चक्क त्याच कलर झेरॉक्सच्या आधारे भाजपच्या नावावर आणि अपक्ष अशा दोन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक यंत्रणेसह पक्षालाही गुंडाळले.
केळुस्करांच्या या खेळीचा पत्ता लागताच भाजपमधीलच दुसऱ्या एका गटाचे पदाधिकारी विजय पगारे यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी निवडणूक आयोगासह अमित साटम यांच्याकडेही तक्रार केली. त्यानंतर अमित साटम यांनीही हा फॉर्म बनावट असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
"प्रभाग न.१७३ मधून सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ लढण्यासाठी शिल्पा दत्ताराम केळुस्कर यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला असून, सदर अर्जाबरोबर सौ. शिल्पा दत्ताराम केळुस्कर यांनी भाजप पक्षाचा AB फॉर्म सुद्धा जोडलेला आहे, अशी माहिती मिळालेली आहे. परंतु महायुतीतून अधिकृत उमेदवारी हि शिंदे गटातील उमेदवार पूजा रामदास कांबळे याना मिळालेली आहे. अपक्ष उमेदवार म्हणून शिल्पा दत्ताराम केळुस्कर यांनी जोडलेल्या अर्जास माझी हरकत आहे. आपण नमूद माहितीनुसार वरील अर्जाची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी," अशी तक्रार अमित साटम यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर अमित साटम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिल्पा केळुस्कर यांचा एबी फॉर्म रद्द करण्याची विनंती केली आहे.