MNS Shiv Sena Shinde Group News: 'मनसे'चे राज्य सचिव व भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड तसेच महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष परेश तेलंग यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. अलीकडेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंची अधिकृत युती जाहीर केली. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होताच राज्यभरात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. परंतु, लगेचच दुसऱ्या दिवशीपासून मनसेला मोठी गळती लागल्याचे समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तेलंग हे मलबार हिल विधानसभेतील प्रभाग क्र. २१७ मधून पालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यावेळी पक्ष प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक संजय घाडी उपस्थित होते. राजन गावंड, परेश तेलंग यांच्यासह धारावीतील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, सायन कोळीवाडा येथील शाखाध्यक्षांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली.
मलबार हिल, धारावी, सायन कोळीवाडा येथील पदाधिकारी शिंदेसेनेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण मुंबई, मलबार हिल विधानसभा प्रभारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना अध्यक्ष परेश तेलंग यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यासोबतच सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्राचे मनसे शाखाध्यक्ष शंकर कवितकर, माजी शाखाध्यक्ष रामचंद्र देवेंद्र, उप शाखाध्यक्ष प्रशांत इंगवले, राजू गायकवाड, गणेश गुरुराम यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. धारावी विधानसभा क्षेत्रातील मनसे विद्यार्थी सेना विभाग सचिव बालनितीन बाडार, उपविभाग अध्यक्ष एस.जे.रॉबर्ट बाडार, उपविभाग अध्यक्ष कबीर राज, उपविभाग अध्यक्ष महेंद्र कोलड्री यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला एकामागून एक अनेक धक्के बसले. संपूर्ण राज्यातून बडे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटासह भाजपा पक्षात प्रवेश केला. उद्धवसेनेला लागलेली गळती अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नगर पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकीतही ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरूच होते. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही उद्धवसेनेतून गळती होत आहे. ठाकरे गटासोबतच आता मनसेतूनही एकामागोमाग एक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाला रामराम करताना पाहायला मिळत आहेत.
Web Summary : Key MNS leaders, including state secretary Rajan Gawand and cable wing president Paresh Telang, joined Eknath Shinde's Shiv Sena. This follows the recent alliance talks between Uddhav and Raj Thackeray, causing upheaval within MNS ranks, particularly in Mumbai's Malabar Hill, Dharavi, and Sion Koliwada areas.
Web Summary : मनसे के राज्य सचिव राजन गावंड और केबल सेना अध्यक्ष परेश तेलंग सहित कई प्रमुख नेता एकनाथ शिंदे की शिवसेना में शामिल हो गए। उद्धव और राज ठाकरे के बीच गठबंधन की चर्चा के बाद मनसे में उथल-पुथल मची है, खासकर मुंबई के मालाबार हिल, धारावी और सायन कोलीवाड़ा क्षेत्रों में।