‘मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार’, नवाब मलिक यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 20:31 IST2026-01-02T20:28:45+5:302026-01-02T20:31:58+5:30
Mumbai Municipal Corporation Election: झारखंडमध्ये एक जागा असताना मुख्यमंत्री होऊ शकतो तर ३० जागांवरही राष्ट्रवादीचा मुंबईत महापौर होऊ शकतो, असा ठाम दावा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

‘मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार’, नवाब मलिक यांचा दावा
मुंबई - झारखंडमध्ये एक जागा असताना मुख्यमंत्री होऊ शकतो तर ३० जागांवरही राष्ट्रवादीचा मुंबईत महापौर होऊ शकतो, असा ठाम दावा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
दीर्घकाळानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची गरज असो वा नसो, राष्ट्रवादीची ताकद मुंबईत किती आहे हे १६ जानेवारीला समजेल, असे स्पष्ट संकेतही त्यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या माध्यमातून ९४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत . तसेच ९५ व्या जागेवरही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, पण तो किरकोळ कारणावरून रद्द करण्यात आला आहे. याशिवाय दोन ठिकाणी पुरस्कृत उमेदवार केलेले आहेत. त्यामध्ये धारावी आणि रमाबाई आंबेडकरनगर-कामराजनगरचा समावेश असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
तसेच पूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने लढू शकतो, तिथे उमेदवार देण्यात आले आहेत. आमच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या जास्त असून, उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनिअर, भाजी विक्रेते, सफाई कामगार, आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषिक किंवा या राज्यातील भूमिपूत्र जे मुंबईला कर्मभूमी समजतात त्यांना संधी दिलेली आहे. सर्वधर्मीय लोकांशिवाय मुस्लिम घटक, ख्रिश्चन, या घटकातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ते पिुढे म्हणाले की, बरेच लोक उत्तर भारतीयांना आपली स्वत:ची मते समजतात. त्यांची भावना झालीय की, आमच्यावर अन्याय होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुंबईत सर्वाधिक उमेदवारी उत्तर भारतीयांना दिली आहे. त्यामध्ये एकाच विशेष वर्गाला दिली आहे असे नाही तर विविध जातीतील उत्तर भारतीय लोकांना त्यामध्ये दक्षिण भारतीय, तेलगू भाषिक, अशा पध्दतीची यादी असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मुंबईत आम्ही काही ठिकाणी भाजपविरोधात तर काही ठिकाणी शिंदे सेनेसोबत तर काही ठिकाणी कॉंग्रेस विरोधात लढत आहोत. वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळी परिस्थिती आहे. आम्ही एका पक्षाच्या विरोधात आहे असे नाही तर आम्ही आमचा उमेदवार जिंकण्यासाठी लढतो आहोत त्यामुळे प्रतिस्पर्धी कोण असेल हे लवकरच समजेल हे सांगतानाच भाजपच्या काही जागा आम्ही जिंकतोय असा दावाही नवाब मलिक यांनी केला.