Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:44 IST

Congress Vanchit Bahujan Aghadi Alliance in BMC Election 2026: वंचित ६२ जागा लढवणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ‘वंचित’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची घोषणा.

Congress Vanchit Bahujan Aghadi Alliance in BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसवंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसे अधिकार दोन्ही पक्षाने दिलेले आहेत. आज काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी आघाडीचा निर्णय झाला, याला विशेष महत्व आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आघाडीची घोषणा केली.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती ही नैसर्गिक युती आहे. दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेत, संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा दोघांचा विचार आहे. समता, बंधुत्व व सामाजिक न्यायाची भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संवैधानिक मुल्यांशी तडजोड करणारे नाहीत. १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होती, आता पुन्हा २५ वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले आहेत. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागला पण आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे, असे सपकाळ म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर लढणार आहे

वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यावेळी म्हणाले की, देश विघातक भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिले पाऊल टाकले व सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली होती. मुंबई महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर लढणार आहे, असे पुंडकर यांनी सांगितले. 

दरम्यान, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा कधीच समाधानकारक होत नसते पण कुठेतरी थांबावे लागते. आघाडीसाठी दोन्ही बाजूकडून सकारात्मक चर्चा झाली. मुंबई महापालिकेसाठी आज आघाडी जाहीर करण्यात आली असून इतर महानगरपालिकेत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेतृत्व सकारात्मक निर्णय घेईल, असे मोकळे म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी मुंबईतील खालील वॉर्डांमध्ये निवडणुकीसाठी उमेदवार देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

६, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, २४, २५, २७, ३०, ३८, ४२, ५३, ५४, ५६, ६७, ६८, ७६, ८०, ८४, ८५, ८८, ९५, ९८, १०७, १०८, १११, ११३, ११४, ११७, ११८, ११९, १२१, १२२, १२३, १२४, १२७, १३९, १४६, ७३, १५३, १५५, १५७, १६०, १६४, १६९, १७३, १७७, १८२, ४६, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २०२, २०७, २२५.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress-Vanchit Alliance for Mumbai Municipal Corporation Elections; Seat Sharing Finalized!

Web Summary : Congress and Vanchit Bahujan Aghadi form alliance for Mumbai's BMC election, with Vanchit contesting 62 seats. Other municipal corporation decisions will be made locally.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६काँग्रेसहर्षवर्धन सपकाळवंचित बहुजन आघाडी