महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 05:51 IST2026-01-09T05:50:49+5:302026-01-09T05:51:26+5:30
मुंबईत भाजपच्या उमेदवारांमध्ये ९२, तर शिंदेसेनेचे ६१ उमेदवार कोट्यधीश आहेत.

महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत महायुतीच्या म्हणजेच भाजप - शिंदेसेना उमेदवारांमध्ये तब्बल १५३ कोट्यधीश उमेदवार असून, यात सर्वाधिक संपत्ती प्रभाग १२२चे उमेदवार चंदन शर्मा (८४ कोटी) यांच्याकडे असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे, तर सर्वात कमी संपत्ती शिंदेसेनेच्या प्रभाग १४०मधील २८ वर्षीय उमेदवार सोनाली जाधव (४४ हजार) यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत भाजपच्या उमेदवारांमध्ये ९२, तर शिंदेसेनेचे ६१ उमेदवार कोट्यधीश आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक संपत्ती असलेले भाजपचे उमेदवार चंदन शर्मा यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. शर्मा यांचे शिक्षण बी. कॉम., एल. एल. बी.पर्यंत झाले असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. प्रतिज्ञापत्रातून त्यांनी एकूण संपत्ती ८४ कोटी ७७ लाख रुपये इतकी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. शर्मा यांनी २०१७मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रातून १८ कोटी संपत्ती जाहीर केली. तर २०१७ मध्ये त्यांचा प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांची पत्नी चारू यांनी प्रभाग १२० मधून निवडणूक लढवली होती. मात्र एकसंघ शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडकर यांनी त्यांचा पराभव केला.
पत्नीलाच दिले ३२ लाख कर्ज
विक्रोळी धनंजय पिसाळ (७०) यांची २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत ८ कोटी ५५ लाख संपत्ती होती. यावर्षी ती २१ कोटी ८२ लाखांवर पोहचली आहे. यात तब्बल १३ कोटी ८२ लाखांनी वाढ झाली. कर्जदारांमध्ये पत्नीने त्यांच्याकडून ३२ लाख घेतल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
शिंदेसेनेच्या निर्मिती कानडेंकडे ५४ हजारांची संपत्ती
महायुतीत सगळ्यात कमी संपत्ती शिंदेसेनेच्या सोनाली जाधव यांची आहे. बी. कॉम. असलेल्या जाधव या नोकरी करत असून, त्यांनी ४४,३४२ रुपये इतकी संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. जाधव यांच्या खालोखाल प्रभाग १३३ मधील शिंदेसेनेच्याच २५ वर्षीय निर्मिती कानडे यांचा क्रमांक लागतो. त्यांचे शिक्षण बी. एससी. (आयटी) झाले असून, त्यांच्याकडे ५४,२३७ रुपये संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक कार्यालयाला सादर केली आहे.
४४२ तोळे सोने, अन् २५ किलो चांदी
चंदन शर्मा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ४४२ तोळे सोने, अन् २५ किलो चांदी असल्याचे नमूद केले आहे. २०१२च्या तुलनेत यंदा त्यांच्या संपत्तीत थेट ६६ कोटींची वाढ होत आकडा ८४ कोटीवर पोहचला आहे. तसेच २०१७मध्ये ११ कोटींचे असलेले कर्जही एक कोटींवर आले आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ कोटी ७४ लाख असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
महायुतीचे प्रमुख श्रीमंत उमेदवार (आकडे कोटींत)
प्रभाग उमेदवार पक्ष संपत्ती
१६६ मीनल तुर्डे शिंदेसेना ५५.१७
१९४ समाधान सरवणकर शिंदेसेना ४६.५९
१०५ अनिता वैती भाजप २८.८८
९७ हेतल गाला भाजप २७.९३
१८८ भास्कर शेट्टी शिंदेसेना २४.०८