BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:31 IST2025-12-29T09:14:26+5:302025-12-29T09:31:08+5:30
BMC Election 2026 BJP Candidate List: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाने आता उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे.

BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
BMC Election 2026: भाजपाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पण, उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु केले आहे. यावेळी भाजपाने नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणाऱ्या नवनाथ बन यांनाही भाजपाने एबी फॉर्म दिला आहे. तसेच भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना वॉर्ड क्रमांक ४७ मधून उमेदवारी दिली आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक ९ मधून, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना १० वॉर्डमधून उमेदवारी दिली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी दिली आहे. भाजपाने आता थेट एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. दादरमधील वसंतस्मृती कार्यालयात एबी फॉर्म देण्यात येत आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
नील सोमय्या, नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, तेजिंदर सिंग, शिवानंद शेट्टी, स्नेहल तेंडुलकर, सन्नी सानप यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजपाने नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक १३५ मधून उमेदवारी दिली आहे.
भाजपा १२८ जागा लढवणार
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा १२८ जागा लढवणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. यामुळे उमेदवारांनी एबी फॉर्मसाठी गर्दी केली आहे, भाजपाने अजूनही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.