BMC Election 2025: मुंबई पालिका निवडणुकीसाठी १२ लाख मतदारांची भर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:14 IST2025-11-21T15:13:36+5:302025-11-21T15:14:27+5:30
Mumbai Civic Polls: मुंबई निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता गुरुवारी मतदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली.

BMC Election 2025: मुंबई पालिका निवडणुकीसाठी १२ लाख मतदारांची भर!
मुंबई निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता गुरुवारी मतदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली. २०१७मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ११ लाख ८० हजार १९१ मतदारांची वाढ झाल्याचे दिसत आहे. आता पुढील काळात वॉर्डनिहाय किती मतदार वाढले, ते स्पष्ट होईल. मागील विधानसभा निवडणुकीची यादी गृहीत धरून जुलै २०२५ मध्ये ही मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेले मतदार कोणाच्या पथ्यावर पडणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत मतदारांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर किती मतदार वाढले किंवा मतदारांमध्ये घट झाली, ते स्पष्ट होईल. २२७ प्रभागांची मतदार यादी महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ९१ लाख ६४ हजार १२५ मतदार होते. २०१७ मध्ये ४४.७३ टक्के मतदान झाले होते. १ जुलै २०२५ च्या विधानसभा यादीनुसार मतदारांची संख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१६ आहे. त्यात पुरुष मतदारसंख्या ५५ लाख १६ हजार ७०८ आणि महिला मतदारांची संख्या ४८ लाख २६ हजार ५०९ होती. अन्य मतदार (ट्रान्स जेंडर) १,०९९ होते. दरम्यान, आता हरकती, सूचना काय येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या तारखा
२७ नोव्हेंबर: प्रारूप मतदार यादीवर हरकती सुचना दाखल करण्याची अंतिम तारीख
५ डिसेंबर: हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करणे
प्रभाग कार्यालय, सहाय्यक आयुक्तांकडे नोंदवा त्रुटी
मतदार यादीत काही चुका, त्रुटी अथवा इतर बाबतीत नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना प्रभाग कार्यालयात अथवा सहाय्यक आयुक्त यांच्याकडे नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून त्या ५ डिसेंबर रोजी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
फोर्ट येथील निवडणूक विभागात अर्ज उपलब्ध
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादींबाबत काही हरकती व सूचना दाखल करायच्या असतील, अशा मतदारांनी 'नमुना अ'मध्ये आणि तक्रारदारांनी 'नमुना ब'मध्ये (उप करनिर्धारक व संकलक (निवडणूक) (प्र.) अर्ज भरावेत. फोर्ट येथील महापालिका मुख्य कार्यालयातील नविन इमारतीमधील तिसरा मजल्यावरील निवडणूक विभागात अर्ज विक्रीस उपलब्ध आहेत.
मतदार यादीत तुमचे नाव कसे शोधाल?
हरकती व सूचना दाखल करण्यासाठीच्या कार्यालयांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथून तिसऱ्या क्रमांकावरच्या पर्यायावरून मतदार यादी डाउनलोड करता येईल. त्याखालील संबंधित माहिती भरावी. व्होटर हेल्पलाईन अॅपवरही यादी पाहता येईल. महाराष्ट्र राज्याचा पर्याय निवडा. तुमचा मोबाइल नंबर टाका. तुमच्याशी संबंधित माहिती टाका.